नानांच्या भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

काँग्रेसने पुष्कळ दिले;पुढची राजकीय भुमिका कायःनानांचे पुनर्वसन होणार का?

नानांच्या भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

कराड/प्रतिनिधीः-

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. ते विधानपरिषद सदस्य आ. आनंदराव पाटील यांची विधानपरिषदेची मुदत आज संपत असून नाना कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाबा म्हणजे नाना असे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. मात्र, नाना आज अखेर शरीराने काँग्रेसमध्ये होते. तर मनाने भाजपमध्ये. त्यांनी गत विधानसभा निवडणुकीवेळी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्याशी जवळीक वाढवली व आपले पुतणे आणि बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील व चिरंजीव मानसिंग व प्रताप पाटील यांना निवडणुकीअधी भाजपचा मफलर गळ्यात घालून नानांनी आपली वाट काय असणार याचे संकेत दिले. त्यावेळी पासून आजअखेर नानांनी भाजपात प्रवेश केलेला नाही. नाना विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लाक्ष लागले आहे. नानांचे पुर्नवसन कसे होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांच्या आमदारकीची मुदत आज संपत असून नानांनी काँग्रेस अंतर्गत झालेल्या मान-अपमानामुळे आपली नाराजी व्यक्त करत पहिले काही दिवस घरात थांबून आपल्याबाबत काही निर्णय घेतला जातो का याची वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील समर्थकांचा विजयनगरला मेळावा बोलवला. या मेळाव्यामध्ये आपणाला पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात व्यवस्थित वागणूक मिळत नाही. कार्यक्रमाला बोलावले जात नाही. नेत्याच्या निष्ठेसाठी गेलो तर अवमान केला जातो. त्यामुळे मी काय भुमिका घ्यावी, असा सवालच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला होता. काहींनी आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले. तर काहींनी आपण पक्षातच रहावे, असा सल्ला दिला. मात्र, नानांनी स्वतः शांत राहत आपले पुतणे सुनील पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र प्रताप व मानसिंग यांनी भाजपात प्रवेश करून धाडले आणि आपणही कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित न राहता काही राजकीय घडामोडी पार पडल्या. यावर आज तालुक्यात पुन्हा एकदा चर्चा रंगात आली आहे. नाना विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर कोणती भुमिका घेणार ते भाजपात प्रवेश करणार का? त्यांचे भाजपा पुर्नवसन करणार का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
आ. आनंदराव पाटील हे 1978 पासून स्व. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करत होते. एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून सातत्याने चव्हाण घराण्याने नानांच्याकडे पाहिले आणि नानांना युवक काँग्रेस पासून ते जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे ताब्यात दिली. नानांनीही एकनिष्ठ राहून त्यांना साथ दिली. नानांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यावेळी नानांनी अनेक रखडलेली कामे मार्गी लावली. नानांची याठिकाणची मुदत संपल्यानंतर नानांना तत्कालीन मुख्यमंत्री असलेले व त्यांचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेची संधी दिली. नानांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर संच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशी भावना जिल्हावासीयांची झाली होती. बाबांना त्यांनी काम सांगितले आणि ते झाले नाही असे कधी घडले नाही. उभा महाराष्ट्र बाबांची सावली म्हणून आनंदराव पाटील यांच्याकडे पहात होता. आनंदराव पाटील यांना त्यावेळी शाडो मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात संबोधले जात होते. पण 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीअधी माशी कोठे शिंकली हे कळलेच नाही आणि नाना बाबांच्यापासून दुर गेले. त्यानंतर अनेकवेळा नानांना विचारणा केली असता नानांनी बाबांच्याबद्दल कधीही टिका केली नाही. तर बाबांनाही अनेक पत्रकार परिषदेत विचारले असता, बाबाही नो कमेंट्स एवढेच उत्तर देवून या विषयाला बगल देत राहिले. निवडणुकीत आपल्याबरोबर न राहिल्याने बाबा हे सध्या नानांच्यावर नाराज असणारच... तर नाना बाबांनी बोलवले नाही म्हणून नाराज असणार... उद्या राजकीय कारकिर्दीत ते काय भुमिका घेतात हे सर्वात महत्वाचे आहे. नाना संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत ठेवू शकतात हे त्यांनी यापुर्वी अनेकदा सिद्ध केले आहे. केवळ संघटनात्मक पातळीवरच त्यांनी जिल्ह्यात आपला ठसा उमटवला होता. आणि त्या माध्यमातूनच पक्षानेही त्यांना साथ दिली होती. नानांची विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेतात. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.