सर्वसामान्यांचे नेतृत्व

सर्वसामान्यांचे नेतृत्व

लोकचळवळीचे व्यासपिठ लोकांना बरोबर घेवून कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे विलासकाका उंडाळकर यांची राजकीय कारकीर्द. सातार्‍यात राहून कराड दक्षिणवर आपली पकड मजबूत ठेवत सलग 35 वर्षे विधानसभेचे प्रतिनिधीत्व करण्याचा वकूब हा काकांनी सहजासहजी पार पाडला नाही. यासाठी त्यांची कार्यकर्त्यांशी असलेली नाळ ही पक्की होती. काकांच्या सानिध्यात आलेला कोणताही कार्यकर्ता सहजासहजी त्यांच्यापासून दूर जाण्यास तयार नसायचा. हा कालखंड त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवत सहजरित्या पार केला. 1967 पासूनचा कार्यकाल हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. या लोकनेत्याचा वाढदिवस कोणत्याही कार्यक्रमाविना पार पडतो. हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे.
1967 ला जिल्हा परिषद सदस्य झालेले विलासकाका भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवतील असे त्याकाळी कोणाला वाटलेही नसेल. मात्र, प्रत्यक्षात हे त्यांनी करून दाखवले. प्रसंगी आपल्या सर्व भुमिकांना बगल देत पक्षासाठी त्यागाची भुमिका ठेवली. लोकसभेच्या निवडणुकीची संधी मिळाल्यानंतर काकांनी ती लढवण्याचा निर्णय घेतला. तेथेच त्यांच्या राजाकरणाचा खर्‍या अर्थाने उदय झाला. त्यानंतर जिल्हा काँग्रेस, सातारा जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवित असताना स्व. यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबांशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. जिल्हा बँकेवर पकड मिळवली. एकहाती जिल्हा बँकेची सत्ता चालवत आजअखेर जिल्हा बँकेचे संचालक पद आपल्याकडे ठेवले असले तरी ज्याकाळी जिल्हा बँक त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. त्या कालखंडात त्यांनी जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात आपली चुणूक दाखवत सर्वजण विधानसभा मतदार संघात आपले कौशल्य सिद्ध केले. पर्यायाने 1999 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते त्यांनी सिद्ध करूनही दाखवले. राष्ट्रवादीच्या निर्मिती आणि काँग्रेसचा एकमेव आमदार होण्याचा मान काकांनी मिळवला. आख्खी फलटण राष्ट्रवादीबरोबर होती तर काका एकटे काँग्रेसबरोबर होते. तरीही जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते त्यांच्या भेटीला वेटींग असल्याचे पहायला मिळत होते. हा त्यांचा राजकीय क्षेत्रातील कौशल्याचा भाग होता. म्हणूनच त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवली होती.
एकीकडे जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा ठेवण्यासाठी पर्यायाने सातार्‍यात रहात दक्षिणवरही आपली नजर कायम ठेवत प्रत्येक कार्यकर्त्याशी नावानिशी ओळखणारा आणि नाव घेवून हाक मारणारा नेता म्हणजे विलासकाका. काका आले आणि त्यांच्या भोवतीने कार्यकर्त्यांचे जाळे नाही असे कधीच घडले नाही. दिवसभर काका आपल्या कोणत्याही कामात असले तरी त्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणमधील कार्यकर्त्यांच्यात समरस होवून त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी.. त्यांच्या कालखंडात अनेक संसार उभे राहिले. अनेकजणांना जिल्हा बँक असो अथवा इतर ठिकाणी नोकर्‍या मिळाल्या. हे सर्व करत असताना सलग पन्नास वर्षे कार्यकर्त्यांच्या मिसळून एकवेळचे जेवण कार्यकर्त्यांच्याबरोबर करणारा हा वेगळा प्रकार आजपर्यंत कोणत्याही नेत्याने केलेला नाही अथवा भविष्यात करू शकत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये बसून जेवण करणारा असा हा नेता... याचे हे वेगळे वैशिष्ट्य आहे. काकांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिलेही असतील. मात्र, त्यांच्यावर कसलाही बालंट आजपर्यंत आला नाही. अथवा अशा प्रकारापासून ते जाणून बुजून दूर रहायचे. राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू होवू शकतो, हे गृहित धरून ते राजकारण करत. तर आजचा शत्रू उद्याचा मित्र असेल हे करण्याची शक्ती फक्त काकांच्यात होती. डोंगरी भागात कार्य करत असताना त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. अनेक वर्षे मैलोमैली डोक्यावर घागर घेवून प्यायला पाणी नेण्याची परिस्थिती बदलण्याचे धाडस काकांनी केेले. वाड्या-वस्त्यांपर्यंत नळपाणीपुरवठ्याच्या योजना राबवून महिलांच्या डोक्यावरील कळशी बंद केली. जायला-यायला रस्ते नव्हते. हे रस्ते करून दक्षिण मतदारसंघात रस्त्याचे जाळे विनले. दुरदृष्टी ठेवत सतत सावध राहून राजकीय आखाडे आखले. बाजारसमिती असो अथवा खरेदी-विक्री संघ आणि कोयना दुध संघावर सलग आपले वर्चस्व अबाधित ठेवले. कोणीही त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा ठपका ठेवू शकला नाही अथवा ठेवूही शकत नाही. लोकनेत्यांची भुमिका कशी असावी, हे काकांनी दाखवून दिले. जनतेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणारे हे नेतृत्व आजच्या आधुनिक युगातही साध्या राहणीमानाने परिचित आहे. एवढे मोठे कार्य करूनही मी काय केले नाही. माझे ते कर्तव्य होते. असे ठामपणे सांगण्याचे धाडसही त्यांच्याकडे आहे. एखाद्याकडे सर्व सुविधा असतात पण काकांच्याकडे कसलीही सुविधा नाही. ना मोबाईल... ना खिशाला पेन... आणि किंबहुना पैसेही अशी परिस्थिती त्यांची असते. तरी हजारो लोकांना मदतीचा हात मात्र पुढे असतो. त्यांनी आपल्या कारकीर्दीत कधीही तडजोड केली नाही. मग ती घरगुती असो अथवा राजकीय, आपला विचार हा कायमस्वरूपी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ठामपणे सुरू ठेवले आहे. अशा या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसांनी निर्माण केलेली रयत संघटना ही आजपर्यंत कामकाज करत आहे. देश विसरला असेल अथवा राज्य विसरले असेल मात्र काका कधी स्वातंत्र्यसैनिकांना विसरले नाहीत. त्यांच्या त्यागाची दखल घेत त्यांचा सन्मान करणे हे सातत्याने चळवळीचे व्यासपिठ राबवत एक आदर्श घालून दिला. अशा या नेतृत्वाचा आज वाढदिवस असून त्यांना दैनिक प्रीतिसंगमच्यावतीने हार्दिक शुभेच्छा....