सातारा जिल्ह्यात रुजतोय कोरोनामुक्तीचा 'कृष्णा पॅटर्न'

आज एकाच दिवशी तब्बल 20 जणांना डिस्चार्ज; आत्तापर्यंत 54 जणांना डिस्चार्ज देऊन 'कृष्णा'ने गाठले कोरोनामुक्तीचे अर्धशतक

सातारा जिल्ह्यात रुजतोय कोरोनामुक्तीचा 'कृष्णा पॅटर्न'

कराड/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरीपार गेला असताना, कृष्णा हॉस्पिटलने मात्र आपल्या यशस्वी उपचाराने कोरोनामुक्तीचे अर्धशतक पूर्ण केले आहे. आज कृष्णा हॉस्पिटलमधून एकाच दिवशी 20 कोरोनामुक्त रुग्णांना  टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा 'कृष्णा पॅटर्न' रुजू लागला आहे. 

कृष्णा हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत एकूण 77 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. यापैकी आजअखेर 54 जण कोरोनामुक्त झाले असून, आता उर्वरित 22 जणांवर उपचार सुरू आहेत. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये दीड महिन्याचा बाळापासून ते 70 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश असून, विशेषतः महिलांची संख्या मोठी असून, कोरोनाला हरविणे शक्य असल्याचा संदेशच आज डिस्चार्ज झालेल्या स्त्री-पुरुषांनी दिला आहे.

कृष्णा हॉस्पिटलमधून यशस्वी उपचारानंतर आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये वनवासमाची येथील 2 महिन्याचे बाळ, दीड वर्षाचे बाळ, 15 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 17 वर्षीय मुलगी, 20 वर्षीय तरुणी, 39 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 52 वर्षीय पुरुष, साकुर्डी येथील 4 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरुष, गोटे येथील 26 वर्षीय युवक, बनवडी येथील 23 वर्षीय युवती, गमेवाडी येथील 26 वर्षीय महिला, तांबवे येथील 54 वर्षीय पुरुष आणि शाहूपुरी सातारा येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सर्व कोरोनामुक्त रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आत्तापर्यंत 54 जणांना बरे करण्यात आम्हाला यश आले असून, उर्वरित 22 जणदेखील लवकरच कोरोनामुक्त होतील, याची आम्हाला खात्री आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना वॉर्डची संख्या वाढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, राजेंद्र संदे, डॉ. मनीषा लड्डद, डॉ. अपर्णा पतंगे यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

उंब्रज येथील बालरोगतज्ज्ञही झाले कोरोनामुक्त

डेरवण येथील कोरोना पॉझिटिव्ह लहान बाळावर उपचार करताना स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झालेले उंब्रज येथील 40 वर्षीय बालरोगतज्ज्ञ यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, याबाबतचा अनुभव सांगताना त्यांनी जीवाला धोका असला तरी रुग्णसेवा करणे हे आमचे कर्तव्य असून, ते भविष्यातदेखील करत राहणारच असल्याचा निर्धार व्यक्त केला.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■