बाबांची भूमिका गुलदस्त्यात..!

बाबांची भूमिका गुलदस्त्यात..!

कराड/प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार याबाबत सोशल मीडियात धुरळा उडाला आहे.गेल्या दोन महिन्यांत राजकीय वर्तुळात कराडमध्ये बसून देशभर खळबळ उडवून देणारे कॉग्रेस मधील एकमेव नेतृत्व म्हणून बाबांचे नाव घ्यावे लागेल,देशपातळीवर केंद्राशी टक्कर देण्यासाठी पक्ष त्यांना कोणत्याही परिस्थितीत अडकून न ठेवता पक्ष त्यांंचा उपयोग पक्षवाढीसाठी करून घेणार असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. एक अभ्यासू आणि उच्च शिक्षित राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून देशात पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आदराने घेतले जाते, दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात नेहमी किचन कॅबिनेटमध्ये आ.चव्हाण यांचा समावेश असतो.स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पासून काँग्रेस निष्टा नसानसात भिनलेले बाबा सतत काँग्रेच विचारांचा वारसा चालवीत असतात,या बहुआयामी नेतृत्वाबद्दल अचानक विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा चालू झाल्याने राजकीय वर्तुळात सध्या खळबळ पसरली आहे.परंतु बाबांची भूमिका नेहमी प्रमाणे गुलदस्त्यातच आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेत तसेच राज्यसरकारची कायदेशीर बाजू सुप्रीम कोर्टात मांडताना आ.चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.याची जाणीव मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निश्चितच आहे याबाबत त्यांनी वेळोवेळी सूतोवाच केले आहे.राज्यात काँग्रेस विचारसरणी जिवंत ठेवताना बाबांनी प्रसंगी केंद्रासह राज्यातील भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली आहे देवस्थानचे सोने सरकार दप्तरी जमा करून घेणे,असेल अथवा कोविड पॅकेज असेल, किंवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले चोख प्रतिउत्तर असेल सर्वच आघाड्यांवर काँग्रेसचा चेहरा म्हणून बाबांनी भाजप सरकारची पोलखोल केली आहे.संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या धोरणाचा पर्दाफाश करणारे नेतृत्व म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. आज कोणीही पंतप्रधान मोदींच्या विरोधात ब्र काढण्याची हिम्मत करत नसताना आकडेवारी व अभ्यासपूर्ण मांडणी करून बाबांनी केंद्राचा बुरखा फाडला आहे.याचे शल्य केंद्राच्या मनात कायम टोचत असून आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाचे पिल्लू विरोधकांनी तर सोडले नसेल ना अशी शंका राहून राहून अनेकांच्या मनात येत आहे.

केंद्रात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रावर केलेला हल्ला पाहता त्याना राज्यात कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नसेल असेच दर्शवित आहे.कारण काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ म्हणून केंद्र सरकारचा पर्दाफाश करण्यात बाबा कुठेही कमी पडले नाहीत, यामुळे राज्यातील भाजप नेते गर्भगळीत झाले असून अभ्यासू आणि उच्चशिक्षित राजकीय    व्यक्तीमत्वाला तोंड देताना नाकेनऊ आले आहे,बोगस आकडेवारी फेकताना भाजप दहावेळा विचार करत असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या शाब्दिक हल्याने केंद्रातील अनेक मंत्री घायाळ झाले आहेत.

काँग्रेसचा आवाज म्हणून आसूड उगारणारे बाबा राज्यात कोणत्यातरी पदावर बसून शांत बसतील अशी शक्यता दुरापास्त असून, त्यांना दिल्ली विषयी विशेष प्रेम असल्याने देशपातळीवर नेतृत्व करण्यातच समाधान मिळत असावे असे दिसते. कारण लुंगेफुंगे राजकारण करणे बाबांचा पिंड नाही ,यामध्ये त्यांची घुसमटच होत राहणार याची पुरेपूर कल्पना बाबांना असणार आहे.दुरून डोंगर साजरे म्हणत अडचण आली तर मला सांगा मदत नक्की करणार परंतु सोशल डिस्टन्स पाळूनच हा कोरोनाचा संदेश बाबा पाळतील असेच दिसते .यामुळे खुर्चीत बसून आमदार सांभाळण्यापेक्षा माणसात जाऊन पक्ष वाढवणे कधीही चांगले हा कानमंत्र बाबा अमलात आणतील परंतु ६ जनपथ ची हवा कधी पालटेल हे अहमद पटेल यांनाच कळत नाही तर लोकांना काय कळणार.