साताऱ्यातील भोसले- पवार भेटीची चर्चा

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने सातारा हा महत्वाचा बालेकिल्ला समजून तत्कालीन सत्ताधारी भाजपशी लढण्याचा निश्चय केला होता. शरद पवार यामुळे खचले नाहीत तर राष्ट्रवादीला त्यांनी यश मिळवून दिले होते. परंतु सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आमदार म्हणून भाजपमधून निवडून आले होते. सध्या भाजपमध्ये असणारे शिवेंद्र बाबा राष्ट्रवादीच्या अजितदादांना भेटल्यामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविक आहे, परंतु यामागे राजकीय किंवा विकासाचा हेतू असला पाहिजे, असे दिसते.

साताऱ्यातील भोसले- पवार भेटीची चर्चा

          कृष्णाकाठ / अशोक सुतार

            नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथील विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचे आता राष्ट्रवादीशी सख्य नाही, असे म्हणणाऱ्यांना पवार आणि भोसले ही भेट म्हणजे चपराक आहे. आम्ही पूर्वीच म्हटले आहे की, राजकारणात केव्हा काय होईल, याचा नेम नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र किंवा आजचे मित्र उद्याचे शत्रू होऊ शकतात. तसेच राजकारण वेगळे आणि संबंध असणे वेगळे असे मानणारा वर्ग राजकारणात आहे. अजूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनातून राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचे प्रेम कमी झालेले नाही, असे दिसते. विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मकरंद आबांच्या मध्यस्थीने शरद पवार आणि आ.शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती, त्यावेळी शिवेंद्रबाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा प्रकारची आर्जव आबांनी केली होती, असे म्हणतात. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट राजकीय की सर्वसामान्य प्रश्नांसंदर्भात हे अजून कोडे उलगडले नाही. याबद्दल साताऱ्यामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. कदाचित उपमुख्यमंत्री साताऱ्यात आले आहेत म्हणून शिवेंद्रबाबांनी भेट घेतली असण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही विकास कामांबाबत अडथळा आणत नाहीत, असे मतही शिवेंद्रबाबांनी  व्यक्त केले आहे. त्यामुळे शहरातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न त्याबरोबरच एमआयडीसी, अर्धवट राहिलेले कास धरणाचे काम आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात निवेदन हे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना दिले असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने सातारा हा महत्वाचा बालेकिल्ला समजून तत्कालीन सत्ताधारी भाजपशी लढण्याचा निश्चय केला होता. शरद पवार यामुळे खचले नाहीत तर राष्ट्रवादीला त्यांनी यश मिळवून दिले होते. परंतु सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आमदार म्हणून भाजपमधून निवडून आले होते. सध्या भाजपमध्ये असणारे शिवेंद्र बाबा राष्ट्रवादीच्या अजितदादांना भेटल्यामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविक आहे, परंतु यामागे राजकीय किंवा विकासाचा हेतू असला पाहिजे, असे दिसते.                                                                                                                                      एकेकाळी राष्ट्रवादीचा हुकमी एक्का असणारे शिवेंद्र राजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यामुळे त्यावेळी शरद पवार शिवेंद्रराजेंवर नाराज झाले होते. परंतु राजकारणात नेहमी बदल होत असतात आणि ते अपरिहार्य असतात. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पावसात भाषण करून मतदारांना खुश केले होते. त्यांचे ते पावसातील भाषण गाजले होते. किंबहुना पवारांच्या पावसातील भाषणाने राज्यातील राष्ट्रवादीवर सहानुभूतीचा शिडकावा झाला होता आणि पवारांचा पक्ष पुन्हा ताजेतावाना झाला. पक्षातील मरगळ संपली आणि शांत झालेली राष्ट्रवादी पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाली. शरद पवार हे अशी किमया करणारे जादुगार आहेत. ते कुणाबद्दल कधी आकस धरत नाहीत, कुणाला दूर लोटत नाहीत. राजकारणात टिकायचे असेल तर या सर्व गोष्टींचे कसब अंगी बाणवावे लागते. असो. तर भाजपचे आमदार शिवेंद्र राजे भोसले हे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार व शरद पवार याना भेटल्यामुळे प्रसारमाध्यमांनी अनेक तर्कवितर्क सुरु केले आहेत. लोकही चवीने त्याचे चर्वण करत आहेत. मात्र, या भेटीच्या काळात अजित पवार आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली असू शकते. शिवरायांच्या काळानंतर राज्याच्या राजकारणात सातारा हे खूप महत्वाचे ठिकाण ठरले आहे. याच सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवराय यांच्या वंशजांनी राज्य केले, त्यावेळी सातारा ही स्वराज्याची राजधानी होती. नंतर ब्रिटीशांच्या काळात कॉ. नाना पाटलांनी प्रती सरकारची स्थापना याच सातारा जिल्ह्यात केली होती आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी सातारा प्रांतात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग येत होता. असे हे सातारा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्राचे राजकीय केंद्र ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतात. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना उमेदवारी दिली जाते. मात्र, लोकसभेला जिंकलेल्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. यानंतर विधानसभेच्या तोंडावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीदेखील राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. दोन्ही निवडणुका एकाचवेळी झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्व ताकद पणाला लावत उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. तर शिवेंद्रसिंह राजे निवडून आले होते. यातील राजकारण काहीही असो, परंतु साताऱ्यातील घडामोडींची चर्चा राज्यात नेहमीच होते. त्यापैकीच आ. शिवेंद्र राजे आणि पवार यांची नुकतीच झालेली साताऱ्यातील भेट म्हटली पाहिजे.                                                  सातारा जिल्हा रूग्णालयात कोविड चाचणी सेंटर सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत केली.  अजित पवार यावेळी म्हणाले, कोरोना स्थितीचा मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेत आहोत. काहीही करून राज्याला कोरोना संकटातून बाहेर काढायचे आहे. रखडलेले मर्ढेकर स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे पवार म्हणाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाची ६९ एकर जागा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर, नव्या शासकीय विश्रामगृहातील आराखडा तयार करण्यात आला आहे, असे अजित पवार म्हणाले. साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साताऱ्यातील विश्रामगृहात भेट घेतली. दोघांमध्ये जिल्ह्यातील रखडलेल्या विविध विकासकामांवर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाच्या निवडीसाठी सातारा दौऱ्यावर आले असताना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी शिवेंद्रराजे यांनी एमआयडीसी येथील महाराष्ट्र स्कुटर प्लांट लवकर सुरू करण्यात यावा, साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळू लागल्याने कोविड चाचणी केंद्र सातारा जिल्हा रुग्णालयात व्हावे, तर महावितरणने एमआयडीसीतील उद्योग बंद असताना आकारलेले वीज बिल माफ करावे; अशा मागण्याचे निवेदन दिले. शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेत महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्पाबाबत बजाज यांची लवकर भेट घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिली. उद्योग विभागाच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेत साताऱ्यातील देगांव, निगडी या नवीन एमआयडीसींचा समावेश करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन करून पाठवल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. सातारा येथील उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबतची आ. शिवेंद्र राजे यांची भेट विकासकामांची मागणी करण्यासाठी होती. तसेच या भेटीत राजकारणावर काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी राजकारणात उघड करणे सोयीस्कर नसते आणि राजकारण्यांची त्याबाबत खासियत असते. त्यामुळे काही दिवस भोसले- पवार भेटीची चर्चा ही होणारच, अशा चर्चा कोणी रोखू शकत नाहीत. यालाच राजकारण म्हणायचे, तुम्हाला काय वाटते ?