सातारा जिल्ह्यातील क्रिकेटची दशा आणि दिशा...!

सातारा जिल्ह्यातील क्रिकेटची दशा आणि दिशा...!

अनिल कदम/उंब्रज


एकेकाळी सुवर्णयुग अनुभवलेल्या सातारा जिल्ह्यातील क्रिकेट विश्वाला लागलेली उतरती कळा अनेक खेळाडूंच्या जिव्हारी लागली आहे.वीस वर्षांपूर्वी पावसाळा वगळता सकाळी पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गजबजलेल्या असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियम वर सध्या असणारी स्मशान शांतता खेळाडूंच्या काळजाला गरा पाडून जात आहे.स्टेडियमच्या नुतनीकरणा पूर्वीचे गतवैभव पूर्णतः विस्मरणात गेले असून टर्फ विकेटची उडालेली धूळधाण जग्गूच्या नसण्याची आठवण करून देणारी आहे.

जिल्हा परिषदेच्या मैदानावरून सुरू झालेली साताऱ्यातील क्रिकेटची कथा हजेरी माळावरील छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये कधी विसावली हे कुणालाच कधीही कळले नाही.अनेक चांगल्या वाईट बाबींचा कोंडमारा सहन करत जिल्हयात क्रिकेट स्थिरावले अनेक रणजी सामने आयोजित करण्याचा मान मिळाला परंतु सन २०००  नंतरची पुढील पिढी अक्षरशः वाया गेली कारण सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यच मंदावले आणि पर्यायाने जिल्ह्यातील क्रिकेट विश्वाला अधोगती लागली.

कल्याणी,शामसुंदरी ट्रॉफी म्हणजे जिल्ह्यातील क्रिकेटला मेजवानीच असायची कराड,वाई,फलटण, सातारा,ओगलेवाडी येथून टीम सातारा येथे खेळण्यासाठी येत असत,परंतु गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी अशी गत झाली आहे सातारा जिमखाना,सिटी जिमखाना, टीसीसी,वाई पकर्स,कराड व ऑगलेवाडी फलटण येथील टीम मध्ये रंगलेली जुगलबंदी डोळ्यांचे पारणे फेडत असत अनेक नामांकित खेळाडूंची फटकेबाजी बघणे म्हणजे सेहवागला ही दहावेळा मागे सारतील अशी दनादनी असायची स्टेडियम च्या पलीकडे सिक्स मारणाऱ्या सातारकर खेळाडूचे नाव गर्वाने घ्यावे लागते तर थर्ड मॅन ला सिक्स मारण्यात काही खेळाडू हातखंडा होते एकवेळ काही खेळाडूंची फिल्डिंग सध्याच्या हिरवळीला सुद्धा लाजवेल अशीच होती काही झेल अजूनही डोक्याला झिणझिण्या आणतात,जिल्ह्याचा फिरकी मारा खेळताना अनेकांची भंबेरी उडायची तर काही अफलातून विकेट किपिंग पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले, फिरकीच्या जमान्यात भेदक मारा झेलायची संधी मला मिळाली, एक बाऊन्सर कपाळावर लागल्याचा व्रण अजून  क्रिकेटची साक्ष देत आहे.

अनेक दिग्गजांचा रणजी ट्रॉफी तसेच चांगले क्रिकेट खेळण्याच्या अनुभवाचा फायदा सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनने म्हणावा तितका घेतला नाही कारण पुणे, मुंबई आणि महाराष्ट्र अशा दिग्गज संघाकडून खेळलेले खेळाडू निश्चितच जिल्ह्याला दिशादर्शक काम करू शकले असते,खाजगीकरणाचा फटका जिल्हयातील क्रिकेटला बसला असून गोर गरीबाच्या आवाक्याबाहेर असणारे क्रिकेटचे किट होतकरू आणि प्रतिभा असणाऱ्या मुलांना क्रिकेटपासून लांब घेऊन गेले आहे,श्रीमंतांचा खेळ म्हणून पाहायला जाऊ लागल्याने गोरगरीब होतकरू मुले नाउमेद होऊन खेळाकडे पाठ फिरवून पुस्तकी किडे बनू लागली आहेत परंतु एक खेळाडू म्हणून साताऱ्यातील क्रिकेटची दशा आणि दिशा बदलली पाहिजे या मताचा मी आहे,एकेकाळी क्रिकेट आणि बास्केटबॉल,मल्लखांब मध्ये भरारी घेणारा सातारा आज दुर्बीण लावून शोधण्याचा प्रयत्न करावा लागत आहे निश्चितच सर्वानी वज्रमुठ एकत्रित केली तर तो दिवस दूर नसणार आहे आपल्यासाठी नाहीतर पुढील पिढीसाठी म्हाताऱ्यांनी आता मैदानात उतरले पाहिजे तरच शिव छत्रपतींच्या साताऱ्यात क्रिकेटचा ध्वज पुन्हा सन्मानाने फडकेल.

अनिल कदम
माजी खेळाडू(सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन) 
सातारा जिमखाना