अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात नगरसेवकासह सहा जणांना अटक

अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात नगरसेवकासह सहा जणांना अटक

सोलापूर/महेश गायकवाड
 
हॉटेल व्यावसायिक अमोल जगताप रा. हांडे प्लॉट, जुना पुणे नाका जवळ,सोलापूर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात एका नगरसेवकाला काल अटक करण्यात आली आहे. आत्ता पर्यत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर सावकारकीचा व्यवसाय केल्याच्या आणि जगताप याच्या मृत्यु ला कारणीभूत धरून  नगरसेवक लक्ष्मण जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर) यांना काल विजापूर जिल्ह्यातील इंडीजवळ धुळखेड येथे अटक करण्यात आली आहे.

 हांडे प्लॉट येथील बिल्डिंगमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी व दोन मुलांना गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अमोल जगताप यांच्या प्रकरणात पोलिसांनी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांना धूळखेड (ता. इंडी) येथून अटक केली आहे. त्याच्यासोबत सोलापूर येथील नामवंत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ कसबे यासही अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
या गुन्ह्यात बेकायदेशीर सावकारकीची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणात यापूर्वी तीन सावकारांना अटक केलेली आहे. 
नगरसेवक जाधव यांनी मोठी रक्कम जगताप यास व्याजाने दिल्याची माहिती आहे. जाधव हे मोटरसायकलवरून विजापूरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि अजित कुंभार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना धुळखेड येथे अटक केली. याबाबत जळकी पोलीस ठाण्याला सविस्तर रिपोर्ट देऊन त्यांना सोलापुरात आणण्यात आले.

नगरसेवक लक्ष्मण यल्लप्पा जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) यांच्याबरोबरच दशरथ मधुकर कसबे (वय ४५, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ) यासही अटक करण्यात आली आहे. त्यांनी ही अमोल जगताप याला व्याजाने रक्कम दिल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. यापूर्वी सिद्धाराम मल्लप्पा बिराजदार (वय ४०, रा वारद चाळ, मुरारजी पेठ), दिनेशकुमार उर्फ बंडू दिलीप बिराजदार ( वय २८, रा. वारद चाळ, भैय्या चौक), व्यंकटेश पंपण्णा बंडलदिनी (वय ४७ रा. मार्केट यार्ड, हैदराबाद रोड) या सावकाराला अटक केलेली आहे. या सावकारांनी पैशासाठी तगादा लावल्यामुळे अमोल जगताप यांनी पत्नी आणि मुलांचा खून केला आणि स्वतःही आत्महत्या केली, असे पोलिस तपासात समोर येत आहे.