घरातून बाहेर गेलेल्यांना घर कसे द्यायचे ; आ.बाळासाहेब पाटील

पितृ पंधरवडा चालू आहे या पंधरा दिवसात आपले सर्व पूर्वज पृथ्वीतलावर असतात अशी आख्यायिका आहे यामुळे पुढच्या पिढीने केलेली विकासकामे त्यांनाही पाहायला मिळतील

घरातून बाहेर गेलेल्यांना घर कसे द्यायचे ; आ.बाळासाहेब पाटील
पाल ता. कराड येथील तारळी नदीवर पालखी मार्गाच्या होणा-या नवीन पूलाचे नदीपात्रात भूमिपूजन करताना आ. पाटील, देवराज पाटील, शहाजी क्षिरसागर यासह अन्य मान्यवर

उंब्रज / प्रतिनिधी 


स्वतःचे कुटुंब वाचविण्यासाठी सरकारमध्ये जाण्याची भूमिका घेतलेल्यांनी सत्तेचा गैरवापर स्वतः च्या फायद्यासाठी केला आहे. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी बेबंद  झालेली ही विरोधक मंडळी बेताल व्यक्तव्य करत असून  दिशाहीन राजकरण करत असल्याची टीका आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली‌


पाल ता.कराड येथे तारळी नदीवर यात्रा मिरवणूक मार्गावर बांधल्या जाणाऱ्या नवीन पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगांव तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश आय.टी. सेलचे  अध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी सदस्या सुरेखा जाधव, संचालक डी. बी. जाधव, सर्जेराव खंडाईत, बाजार समितीचे सदस्य उद्धवराव फाळके, विनोद जाधव यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आ.पाटील पुढे म्हणाले, महाविकास आघाडी  सरकारने मंजूर केलेल्या या पूलाच्या कामाला तसेच  अन्य विकास कामांच्या निधीला स्थगिती सध्याच्या सरकारने दिली होती.विकास कामाला अडथळा करणारे हे सरकार आहे. मात्र, न्यायालयात दाद मागून न्यायालयाने न्याय दिला असून स्थगिती उठवली आहे.

विकास कामांना विरोध करणारा गट सुद्धा अस्तित्वात नव्हता त्यावेळेपासून आम्ही विकासाची कामे राबवत आहे. लोकसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. भाजप सोशल मीडियावर चुकीचा प्रचार करीत करून  लोकांची दिशाभूल करत असल्याने सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गद्दार लोकांमुळे शिवसेना फुटली आहे. तर भोपाळच्या सभेत अजित दादांवर सत्तर हजार कोटींचा आरोप करण्यात आला आणि सातच दिवसात दादा भाजप बरोबर सत्तेत गेले ज्यांचावर आरोप केला तेच भाजप बरोबर मंत्रिमंडळात आले.स्वतःचे कुटुंब वाचविण्यासाठी  राष्ट्रवादीच्या  काही मंडळी सरकार मध्ये जाण्याची भूमिका घेतली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला जात असून घरातून बाहेर गेलेल्यांना घर कसे द्यायचे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


सुनील माने म्हणाले, नावाप्रमाणे विरोधकांनी वागावे अन्यथा नालायकांना त्या  भाषेतच उत्तर द्यावे.देवाच्या काठीचा आवाज येत नाही कुणाच्या पाठीत पडेल हे सांगता येत नाही. देवराज पाटील यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. सर्व सामान्य नागरिकांसाठी त्यांची कायमच तळमळ असते. विचारांशी ठाम असणारे व्यक्तिमत्त्व आहे. वारसा आणि वसा सांगून जमणार नाही त्या भाषेतच उत्तरे दिली पाहिजेत. १० वर्षे झाली प्रधानसेवकांनी पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल उपस्थित करून  स्वातंत्र्य भविष्यात टिकेल की नाही हे सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी राज्य करायचे असेल तर राज्यकर्ते ही कंत्राटी भरा असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. एका मंत्र्याच्या मागे पन्नास पोलिस लागतात. तर, शेतकऱ्यांच्या २० मुलांची शाळा का नको असा सवालही त्यांनी उपस्थित करून सध्याचे सरकार हे खोके ,कमिशनचे सरकार असून 'मु मै राम, और दिमागमे नथुराम' असणारे सरकार आहे.

देवराज पाटील म्हणाले, पूलाचे काम मंजुर करून  आणल्याच्या विरोधकांनी वावड्या चार दिवसांपासून उठवल्या होत्या.पाठपुरावा आम्ही करायचा आणि श्रेय तुम्ही घ्यायचे हे चालणार नाही.आमच्या कामाचे श्रेय तुम्ही घेऊ नका, तुमच्या कामाचे श्रेय आम्ही घेत नाही असा दम त्यांनी भरला. विकास कामांना अडथळा आणून पायात पाय घालण्याची विचारधारा असणाऱ्या   विरोधक मंडळींनी हे बंद करावे. दंडीलशाहीचा भूमिका बजावून सत्ता बळकावयची कामे सुरू आहे यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. मतदार त्यांना त्यांची जागा लवकरच दाखवून देईल. शेजारच्या गावातील काही मंडळी कराड उत्तरेत येऊन छाती बडवून जातायत. पंचवीस पंधरा कामांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव दिले नाहीत म्हणून चाळीस लाखांची विकास कामे परत गेली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी शहाजी क्षिरसागर, सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पाल, भगतवाडी, हरपळवाडी, इंदोली, हिंगनोळे यासह परिसरातील गावे, वाडीवस्तीवरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आभार सर्जेराव खंडाईत यांनी मानले.