बाजार समितीच्या निवडणूकीत दिग्गज मैदानात

दोन पॅनेल समोरासमोर प्रचारात चुरस जिंकण्याचे दावे

बाजार समितीच्या निवडणूकीत दिग्गज मैदानात

कराड/ प्रतिनिधीः-


कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत दिग्गज मंडळी उतरली असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार याचे संकेत मिळत आहेत. अशातच सत्ताधारी अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची साथ मिळाली आहे, तर आ.बाळासाहेब पाटील-डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलमध्ये कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदिश जगताप, संचालक दयानंद पाटील, तसेच जि.प. चे माजी सभापती आणि सह्याद्री कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे हे दिग्गज उमेदवार असल्याने हे पॅनेल तगडे बनले आहे. यामुळे बाजार समितीच्या निवडणूकीत तालुक्याच्या राजकारणाची आगामी रणनिती काय असू शकते. याचे संकेत मिळत असून या घडामोडीवर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.


कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे उमेदवारी अर्ज ही भरून झाले आहेत.या निवडणूकीत समोरासमोर दोन पॅनेल लढणार हे निश्चित झाले आहे. प्रत्यक्षात लढतही आ.बाळासाहेब पाटील-डॉक्टर अतुल भोसले      यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल विरोधात, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण- उदयसिंह पाटील या पॅनेल मध्ये होणार आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० तारखेपर्यंत असून त्यानंतर कोण कोणासमोर लढणार याचे चित्र स्पष्ट होणार असले तरी प्रत्यक्षात निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. दोन्हीही पॅनेलने आपआपले उमेदवार निच्शित केले आहेत. केवळ घोषणेची औपचारीकता बाकी आहे. सत्ताधारी पॅनेलने जुन्या-नव्या उमेदवारांचा मेळ घालत आपले उमेदवार रणांगणात उतरवले आहेत.  उदयसिंह पाटील यांच्या गटाकडून बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील अशोकराव पाटील पोतलेकर, राजू कदम यांना उमेदवारी देऊन प्रचाराल सुरूवात केली आहे.


कराड शेती उत्पन्न बाजार समितीवर स्व. विलासकाका उंडाळकर यांची एक हाती सत्ता होती, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर पार पडलेल्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाआघाडी तयार झाली या महाआघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा गट त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट आणि मोहिते गट एकत्रित आले. त्यांनी उंडाळकर गटासमोर आव्हान निर्माण केली, या पॅनेलचे नेतृत्व जरी हे नेते करीत असले तरी प्रत्यक्षात महाआघाडी निर्मीती करण्याचे काम मदनराव मोहिते यांनी केले, त्यांनी सर्व गट एकत्रित आणून अनेक वर्षाची सत्ता उधळून लावत सत्ता हस्तगत केली या निवडणूकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या यावेळीही माजी सभापती भिमरावदादा पाटील, महाराष्ट्र केसरी पै.संजय पाटील, जगदीश जगताप, मानसिंगराव जगदाळे हे उमेदवार होते. त्यामुळे उंडाळकर गटाची सत्ता उलथून लावण्यात या नेत्यांच्या बरोबर यांचाही मोठा वाटा होता. या निकाला नंतर सत्तांतर झाले मात्र उंडाळकर गटाला मोठा धक्का सहन करावा लागला.


बाजार समितीत महाआघाडीची सत्ता आल्यानंतर काही कालखंड सर्वकाही अलबेल चालले त्यानंतर अनेक कटू प्रसंगही घडले. पाच वर्षानंतर निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये पुन्हा उंडाळकर गट मैदानात उतरला गेलेली सत्ता हस्तगत करण्यासाठी विलासकाकांनी आपली रणनीती आखली व भोसले गटाला आपल्याबरोबर घेतले, कृष्णा कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भोसले गटाने उंडाळकरांना साथ करण्याचा निर्णय घेतला, ही निवडणुकी अत्यंत अटीतटीची झाली आणि बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा सत्तांतर झाले गेलेली सत्ता उंडाळकरांनी आपल्याकडे खेचून आणली या ठिकाणी महाआघाडी विस्कटलेली पाहायला मिळाली. या निवडणुकीनंतर तब्बल साडेसहा वर्षांनी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत ही नवनवीन  राजकीय समीकरणे उदयास आली आहेत. यावेळी माजी सहकार मंत्री एका पॅनेलचे नेतृत्व करत आहेत त्याला भाजपाचे सरचिटणीस  डॉ. अतुल भोसले यांची साथ मिळाली आहे. खरेतर कराड तालुक्याचे राजकारण ही कायम झुलते असते, प्रत्येक निवडणूक वेगवेगळी समीकरणे घेऊन येत असती. याचा प्रत्यय यापूर्वीच्या अनेक निवडणूकीत आला आहे त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या या बाजार समितीच्या निवडणूकीत येत आहे.


राष्ट्रवादीचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी भाजपाचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्याबरोबर हात मिळवणी करून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन गट एकत्रित आले. आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक सोसायटी गटातून निवडणूक लढवली. यापूर्वी या मतदार संघातून तब्बल ४२ वर्षे विलासकाका   उंडाळकर हे जिल्हा बँकेचे प्रतिनिधीत्व करीत होते. त्यांच्या पश्चात त्याचे सुपूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी  नैसर्गिकरित्या या जागेवर हक्क सांगत आपली उमेदवारी दाखल केली. अत्यंत चुरशीत पार पडलेली हि निवडणूक आ.बाळासाहेब पाटील यांनी जिंकली मात्र या विजयामध्ये निर्णायक भूमीका ही भोसले गटाने बजावली आपल्याकडे असलेली मते भोसलेंनी आमदार बाळासाहेब पाटील यांना दिली आणि बाळासाहेब पाटील हे ७४ मते मिळवून विजयी झाले. याचवेळी होणारी बाजार समितीची निवडणूक ही आमदार बाळासाहेब पाटील आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमार्फत लढवली जाणार हे निश्चित झाले होते.