सांगोला रोडवर भीषण अपघात ; 2 वारकरी जागीच ठार ,दोन जण गंभीर जखमी

सांगोला रोडवर भीषण अपघात ; 2 वारकरी जागीच ठार ,दोन जण गंभीर जखमी

सोलापूर /प्रतिनिधी :


 पंढरपूर सांगोला मार्गावरील कासेगाव फाटा वनीकरण जवळ किया सेलटॉस ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पाईपला जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन वारकरी जागीच ठार झाले तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांना पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला.

राजू संभाजी शिधोळकर व परशुराम संभाजी जवरूचे दोघे राहणार अनगुळ जिल्हा बेळगाव असे मयतांची नावे असून अभिजित हुंबरे व गितेश पोकशेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे सर्व आषाढी एकादशी निमित्त किया सेलटॉस या गाडीतून बेळगाव हून पंढरपूरकडे येत होते. दरम्यान ते पंढरपूर सांगोला रोडवर कासेगाव फाटा वनीकरण जवळ आले असता त्याठिकाणी रस्त्यात एका खड्ड्यासारखा उतार आहे, वेगात उतार समजला नाही त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या सिमेंट पाईपवर जाऊन आदळली.

 गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे. याचवेळी सांगोला तहसिलदार अभिजित पाटील हे सांगोलाकडे जात होते त्यांना हा अपघात दिसताच त्यांनी पोलीस व रुग्णवाहिकेला बोलवून घेतली. आणि जखमींना लाईफलाईन हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताला वन विभाग  जबाबदार असल्याची चर्चा आहे.