कराड 'भूमिअभिलेख'दोघेजन लाचलुचपतच्या जाळ्यात

लाचलुचपतच्या कारवाईने मोजणी खाते हादरले

कराड 'भूमिअभिलेख'दोघेजन लाचलुचपतच्या जाळ्यात

लाचलुचपतच्या कारवाईने मोजणी खाते हादरले

दोघेजण अडकले सापळ्यात

उंब्रज/प्रतिनिधी

कराडच्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांच्यावर लाचलुचपत विभागाने केलेल्या धडक कारवाईने आर्थिक देवाणघेवाण करणारांचे पितळ उघडे पडले आहे.या कारवाईने कार्यालयासह तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.नुकत्याच झालेल्या कारवाईत लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.यामुळे चिरीमिरी साठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.यामुळे लाचलुचपतच्या कारवाईने मोजणी खाते हादरले असून या बाबीची सखोल चौकशी करून यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का याची पाळेमुळे लाचलुचपत विभागाने शोधने गरजेचे आहे.

कराड तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडे कराड दक्षिण व उत्तर या दोन्ही विभागातील शेकडो गावांचा कार्यभार आहे. त्यामुळे जमीन मोजणीच्या,हद्दी कायम इत्यादी कामासाठी भूमिअभिलेख ऑफिसला नेहमीच नागरिकांचा राबता असतो. येणारा प्रत्येक नागरिक हा पाच पन्नास किलोमीटरच्या पल्ल्याचा प्रवास करून येत असतो. आणि नेमक्या याच बाबीचा फायदा ऑफिसमधील कर्मचारी चिरीमिरी उकळण्यासाठी उचलत असतात.कारण डबल हेलपाटे मारण्यापेक्षा चिरीमिरी देऊन काम करून घेण्याकडे नागरिकांचा कल असतो याचा परिणाम सरळमार्गी होणारे काम सुद्धा हातात वजन ठेवल्याशिवाय पूर्ण होत नाही.

कराड भूमी अभिलेख कार्यालयत जवळपास एक अधिकारी व ३० ते ३५ कर्मचारी असे संख्याबळ आहे.यातील प्रत्यक्ष हजर किती असतात हा संशोधनाचा भाग आहे. या सर्वांनी मिळून कराड तालुक्याचे भूमिअभिलेख चे कामकाज चालत असते परंतु सामान्य नागरिकांचे अज्ञान आणि कर्मचाऱ्यांच्या चिरीमिरी साठीच्या अडवणुकीमुळे एका भेटीत विनासायास कोणतेही काम पार पडत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करीत असतात.तसेच झटपट काम करण्यासाठी शेवटी वरदक्षणा मागितली जाते.

 

कराड तालुक्याचा कारभार मागील काही वर्षांपूर्वी भांदिर्गे आणि साळुंखे या अधिकाऱ्यांच्या शिरावर असताना योग्य नियोजन असल्याने कामाचा निपटारा जलद होत होता.येणाऱ्या नागरिकांच्या शंका कुशंका याचे जागेवरच समाधान करून अडचणीचे निराकरण केले जात होते. तसेच या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात १० ते १५ दिवसात मोजणी अथवा इतर कामे मार्गी लागत होती. परंतु भूमिअभिलेखचे तालुक्याचे कारभारी बदलल्यानंतर 'नवा राजा नवा कायदा' या सूत्राने कामकाज चालू लागल्याने, वेळेचे बंधन राहिले नसून मोजणीचे पैसे भरल्यानंतर १० दिवसाच्या कामाला ४ ते ५ महिने लागू लागले आहेत. त्यामुळे जनतेची कामे खोळंबू लागली याचा परिणाम  लोकांचा उद्रेक वाढू लागला,काही जणांची मुद्दाम अडवणूक होऊ लागली यामधून मग वरकमाईची चटक लागल्याने नागरिकांची अडवणूक व पिळवणूक नित्याचीच बाब झाली.शेवटी नाईलाजाने लोकांना लाचलुचपतचा आधार घेऊन लाचखोर कर्मचाऱ्यांना धडा शिकवावा लागत आहे.

सिटीसर्वेच्या ऑफिस मधील असणारा सर्व कर्मचारी वर्ग हा भूमिअभिलेखचा म्हणून ओळखला जातो.त्यामुळे भूमिअभिलेखची कर्मचारी संख्या जरी मोठी दिसत असली तरी बराचसा कर्मचारी वर्ग हा सिटीसर्वे ऑफिसला द्यावा लागत असल्याने कमी कर्मचारी आणि कामाचा आवाका जास्त असल्याने नागरिकांची ससेहोलपट चालू असते. तालुक्यातील सिटी सर्व्हे ची कार्यालये तांबवे,वाठार,कोपर्डे,शेणोली कार्वे उंब्रज मसूर या ठिकाणी असून एका कर्मचाऱ्यांकडे दोन दोन ठिकाणचा भार देण्यात आला आहे या सिटी सर्व्हे कार्यालयात बँक बोजा कमी करणे किंवा नोंद करणे,वारस नोंदी करणे,वेगवेगळ्या मालमत्तेचे एकत्रीकरण करणे पोट हिस्से करणे आणि जागेची मोजणी करणे अशी कामे केली जातात.

भूमिअभिलेख कार्यालयात जो भाग सिटीसर्वे मध्ये समाविष्ट झाला नाही अशा विभागाची सर्व कामे येतात यामध्ये बिगरशेती करणे,मोजणी करणे,फाळणी नकाशा,स्कीम चा उतारा ,टिपण,इत्यादी बाबींचा समावेश होत असतो.या कार्यालयात मोजणीसाठी अथवा इतर कारणासाठी १० ते  ५०  रुपये असणारी शासकीय  फी भरून मिळणारी कागदपत्रे ही नागरिकांची अडवणूक करून काहीतरी थातुरमातुर कारण सांगून टेबलाखालून ३०० ते ५०० घेऊन दिली जातात यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो कागदपत्रे सापडत नाहीत,शोधायला लागेल,उद्या या,अशा दृष्ट चक्रात अडकण्यापेक्षा वरदक्षणा देऊन तातडीने कागद पत्र मिळवण्यासाठी नागरिकांना मजबूर केले जाते.

बिनशेती, पोट हिस्सा,एकत्रीकरण याचा टेबलाखलचा दर तर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे कारण या दराची बोली भाषा ही पेटीत मोजली जात असल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे तर वारस नोंदीला तर ५ ते १५ हजारापर्यंत जशी समोरची व्यक्ती असेल तसा दर ठरत असतो तालुका निरीक्षक ते रेकॉर्ड रूमच्या माणसापर्यंत सगळी यंत्रणाच चिरीमिरी साठी सोकावलेली असून दिवसभरात नागरिकरूपी बकरे कापल्याशिवाय शिपाया पासून ते वरपर्यंत कोणालाच चैन पडत नसल्याचे मत बरेच नागरिक व्यक्त करीत असतात

शासन जर कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय लाभ विनासायास देत असेल तर चिरीमिरी साठी गोरगरीब जनतेची अडवणूक कशासाठी करतात असा सवाल ग्रामीण जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. तालुका भूमिअभिलेख अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यानेच कर्मचारी वरकमाईला चटावले असल्याची भावना सामान्य गोरगरीब जनता व्यक्त करीत आहे आडला हरी अशी अवस्था तालुक्यातील जनतेची झाली असून चिरीमिरी साठी गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचे काम भूमिअभिलेख चे कराड कार्यालय करीत असून याचा योग्य तो पायबंद करण्याची मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.

 

मोजणी साठी दुप्पट खर्च

भूमी अभिलेख  कार्यालयात मोजणी साठी पैसे भरल्यानंतर मशीनच्या साहाय्याने मोजणी करायची असल्याने कारण देत दुप्पट पैसे वसुलीचा गोरख धंदा कराड येथील कार्यालयात सुरू असल्याची तक्रार बहुतांश शेतकऱ्यांची असून एकदा मोजणीचे पैसे भरल्यावर पुन्हा पैसे कशासाठी द्यायचे असा सवाल शेतकरी विचारत असतात परंतु काहीतरी थातूर मातूर कारण सांगून गोरगरीब शेतकऱ्यांच्या कडून मोजणीचे दुप्पट पैसे वसूल करून वरकामाईचा नवीन फंडाकराड भूमी अभिलेख कार्यालयात सुरू असल्याची चर्चा आहे.

 

खाजगी कोण आणि सरकारी कोण प्रश्नचिन्ह

कराड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्यात खाजगी सेवक आणि सरकारी सेवक यामधील फरक सर्वसामान्य माणसांना कळतच नाही कारण सगळेच साहेब झाले असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा गोंधळ उडत असतो तर याच बाबीचा फायदा घेत अनेक कंत्राटी कामगार मालामाल झाले आहेत तर कोणी लाचलुचपत च्या जाळ्यात अडकले आहेत.