भाजपने साम, दाम, दंडाची निती वापरत आघाडीतील 40 नेते पळवले

पृथ्वीराजबाबांचा गौप्यस्फोटःकाका-बाबांचे एकत्रीकरण ही जिल्ह्याच्या राजकीय परिवर्तनाची नांदीःना.बाळासाहेब थोरात

भाजपने साम, दाम, दंडाची निती वापरत आघाडीतील 40 नेते पळवले

भाजपने साम, दाम, दंडाची निती वापरत आघाडीतील 40 नेते पळवले


पृथ्वीराजबाबांचा गौप्यस्फोटःकाका-बाबांचे एकत्रीकरण ही जिल्ह्याच्या राजकीय परिवर्तनाची नांदीःना.बाळासाहेब थोरात


कराड/प्रतिनिधीः-


स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिकीकरणाचे स्वप्न पाहिले. राज्यातील अनेक माणसे शोधली व घडवली. अशा या नेतृत्वाच्या कर्मभूमीत आजचा हा ऐतिहासिक सोहळा पार पडत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा आणि विलासराव पाटील उंडाळकरांच्यात हा झालेला प्रीतिसंगम ही जिल्ह्यातील राजकीय परिवर्तनाची नांदी आहे. हा जिल्ह्याचा संदेश राज्याला आदर्श देवून जाईल, असे मत महसूलमंंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करतानाच अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यावर राज्यातील पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. ती त्यांनी जिल्ह्याबरोबरच राज्यात पक्षवाढीसाठी काम करण्यासाठी तयार रहावे. दरम्यान साम, दाम, दंड याची भिती दाखवून भाजपने आघाडीतील 40 च्या वर नेते पळवले, असा गौफ्यस्पोट माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

 

राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते व माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, ना. विश्वजीत कदम, रयत संघटनेचे युवा नेत व जि.प.सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी आ. मोहन जोशी, संजय बालकुडे, सुरेश कुर्‍हाडे, सहप्रभारी सोनल पटेल, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिण कॉग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, डॉ. इंद्रजीत मोहिते, शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, कोयना दुध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे व इतर संस्थांचे पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ना. बाळासाहेब थोरात पुढे बोलताना म्हणाले, पृथ्वीराजबाबांचे नेतृत्व आणि विलासकाकांचे संघटन कौशल्य याच्या जोरावर तालुका स्तरापासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व निवडणुकात काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल. यासाठी कार्यकर्त्यांनी कोणतेही मतभेद मनामध्ये न ठेवता काम करायला हवे. असे सांगत केंद्रातील सरकारने माणसा-माणसामध्ये भेद निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. ट्रंपनीही काळ्या-गोर्‍याचा भेद निर्माण केला. ज्या पद्धतीने अमेरिकेतील हुकूमशहाला तेथील जनतेने संपुष्टात आणले. त्याच पद्धतीने येथीलही नेत्याला संपुष्टात आणले जाईल. तालुका स्तरापासून ते दिल्लीच्या संसेदेपर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकलेला पहायला मिळेल. कार्यकर्त्यांनी याची सुरूवात आपल्या घरापासून केली पाहिजे. केंद्राने सध्या कृषी विधेयक पारीत केले आहे. त्याचबरोबर कामगारांचा कायदाही मोडित काढून धनदांडग्या व बड्या उद्योगपतींना सांभाळण्याचे काम सुरू ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. कराड तालुक्यात काँग्रेस अंतर्गत दोन गट एकत्रित आले असल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला आता नवी दिशा मिळेल.

 

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणाबरोबरच भाजपावर कडाडून टिका केली. ते म्हणाले, केंद्रामध्ये मोदी व शहा ही जोड गोळी आहे. त्यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. तो लोकशाहीला गिळकृंत करणारा आहे. तोच आदर्श घेत राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता असताना काम केले. सत्तेत असताना साम, दाम, दंड, भेद ही निती वापरून ज्याला जे हवे आहे ते देवून प्रसंगी तुरूगांची धमकी देवून आघाडीमधील 40 पेक्षा जास्त नेते भाजपात नेले. त्यात उंडाळकर काकांनाही आमिष दाखवल्याचा गौप्यस्फोट आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी करत त्यांनी आपले विचार सोडले नाहीत. आमच्यात थोडेफार मतभेद होते मात्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी पक्षाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्वागतार्ह असून जिल्ह्यात काँग्रेसला यामुळे बळकटी मिळेल.


माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काका व आमच्यामध्ये मनभेद नव्हते मतभेद होते. ते विसरून अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून टाकलेले पाऊल महत्वाचे आहे. काँग्रेसची जुळणी करणे ही काळाची गरज आहे. प्रतिसरकार स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ही अवस्था होणे वाईट आहे. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र, त्या खोलात न जात काँग्रेसला जुने दिवस आणण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू. अवघड वाटत असलेतरी अजूनही स्थिती अटोक्याणत येऊ शकते. त्यामुळे आजचे मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय दिशा बदल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरवात कर्‍हाड तालुक्या तून झाली आहे. निवडणूक झाल्यानंतर उदयसिंह पाटीलांची भेट झाली. त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते विलासकाकांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी घरी गेलो. तेथे चर्चा झाली तेव्हा काकांनी माझ्या घरातील एकही व्यक्ती जातीवादी पक्षात जाणार नाही. आमच्या घराला स्वातंत्र्यसैनिकांची पंरपरा आहे, असा विश्वातस दिला. त्यातून त्यांचे आशीर्वाद घेत मनोमिलनाची पाऊले पडली. मागच्या काही गोष्टी झाल्या असतील मात्र, त्या सर्व गोष्टी विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोराताची भेट घेतली. त्यांना कर्‍हाडला येण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोमिलनाची नांदी येथे होत आहे. हे मनोमिलन जिल्ह्याला दिशा देणारे असेल. जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदल्याशिवाय राहणार नाही.


जेष्ठ नेते व माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर म्हणाले की, आमची विचारधारा ही काँगे्रसची आहे. हीच आमची मालमत्ता आहे. आज देश आर्थिक, सामाजिक दृष्ट्या अडचणीत आहे. प्रबोधन करण्याची गरज आहे. नोंदबंदीत कोट्यावधी रूपये हडप केले. शेती व्यवसाय उद्धवस्त करण्याचा डाव सुरू आहे आणि बड्या उद्योगपतींना पोसण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्रातील भाजप सरकारने नेहरू घराण्याचा देश करण्याचेच काम केले. काँग्रेसशिवाय देशाला आता पर्याय नाही. लाट्या, काठ्या खाल्ल्यानेच आज देश उभा आहे. सध्याच्या परिस्थितीत मोर्चाला कोण जात नाही. पद व पैसा पाहिजे. ही नितीमत्ता बदलण्याची गरज आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरजेचे राजकारण करा हा मुलमंत्र दिला. याचाच धागा पकडून आम्ही बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. मंत्रीपद दुय्यम आहे. पक्ष कार्य महत्वाचे असते. भाजपातील नेत्यांनी अनेकांच्या छाताडाला कमळ लावले. आश्वासने दिली. प्रांतीकची नेतृत्व करणार्‍यांची पिढीही त्या ठिकाणी कमळ लावून आलेली पाहिली. मात्र, माझ्याकडे ज्यावेळी विचारणा करायला आले, त्यावेळी मी त्यांना हाकलून लावले. आमची विचारधारा ही पक्की आहे. काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही.


ना. विश्वजीत कदम म्हणाले, आजचा हा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक व अस्मरणीय असा कार्यक्रम आहे. खरेतर या कार्यक्रमाला स्व. पंतगराव कदमसाहेब हवे होते. त्यांना याचा फार आनंद झाला असता. विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा यांनी आपआपल्या ठिकाणी मोठे संगठण निर्माण केले आहे. मित्र पक्षाशी संघर्ष करायचा आहे. त्यासाठी काकासारखे विचार घेवून आम्हा तरूण कार्यकर्त्यांना पुढे गेले पाहिजे. पक्षाने फक्त ताकद द्यावी, सातारा जिल्ह्यात बदल झालेला आपणाला पहायला मिळेल.


अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, आपल्याला यापुढे संघर्षाला पुर्णविराम द्यायचा आहे. संघर्ष अडचणीचा ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही सोडला नाही व सोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्याचे काही लोक चुकीच्या पद्धतीने मार्केटींग करत आहेत. आपण सर्वजण मृगजलाच्या मागे लागलो आहे. शास्वत विचार विसरलो जात आहे. पक्षाच्या माध्यमातून यापुढे आपण ताकद उभी करूया. सर्व गट तट विसरून काम करा. मी हे बदलण्यासाठी व पक्ष वाढीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेन असा संकल्प घेवून कार्यकर्त्यांनी झोकून देवून काम करावे.  यावेळी अजित पाटील-चिखलीकर यांची चौफेर टोलेबाजी आणि कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे प्रस्ताविक आणि प्रा. धनाजी काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विलासकाकाच स्व. चव्हाणसाहेबांचे खरे पाईक
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे खरे पाईक हे विलासकाका आहेत. काकांनी आजपर्यंत अनेक कुरघोड्या केल्या. मात्र, आपली जिल्ह्यावर एकहाती सत्ता ठेवली. काकांनी आता नकाशा काढायचा आणि आम्हाला आदेश द्यायचा. आम्ही त्या ठिकाणी घुसलोच. जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करायची आहे. मात्र, आमचे पृथ्वीराजबाबा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. उपाय होतो पण कुणावर शस्त्रक्रिया होणार नाही आणि त्याला कसलाही त्रास होणार नाही, पण नेतृत्व मनात एक आणि बाहेर एक असे नाही. या दोन नेत्यांचे जे ऐतिहासिक मनोमिलन झाले आहे. यामुळे भल्याभल्यांना आता नवा पॅटर्न पहायला मिळणार आहे. प्रदेशाध्यक्षसाहेब तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या.


आमचंबी ठरलंय..!


पृथ्वीराजबाबा व सतेज पाटील हे माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आले आणि अनेकजण तुमचे काय ठरलय असे विचारू लागले. आम्ही आजपर्यंत काँग्रेसचा विचार सोडला नाही. मी काल काँग्रेसमध्ये होतो, आज आहे आणि उद्याही राहणार. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काँग्रेसचे विचार हीच माझी मालमत्ता आहे, असे मी त्यांना सांगितले. तरीही अनेक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मला सातत्याने विचारायचे तुमचे काय ठरलय... मग आमचंबी ठरलंय..! असे उद्गार विलासकाका यांनी काढताच सभागृहात मोठा हशा पिकला.