तासवडे येथील औद्योगिक वसाहतीतील अवैध उत्खननाबाबत ४२ लाख दंडाची नोटीस.

दै.प्रीतिसंगमच्या बातमीची दखल

तासवडे येथील औद्योगिक वसाहतीतील अवैध उत्खननाबाबत ४२ लाख दंडाची नोटीस.

तासवडे येथील औद्योगिक वसाहतीतील अवैध उत्खननाबाबत ४२ लाख दंडाची नोटीस.

 

दै.प्रीतिसंगमच्या बातमीची दखल

 

उंब्रज/प्रतिनिधी

 

तासवडे ता.कराड येथील औद्योगिक वसाहतीतील अवैध उत्खननाबाबत दै.प्रीतिसंगमच्या वृत्ताची दखल घेऊन कराडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अमरदीप वाकडे यांनी धडक कारवाई करत दंडाची नोटीस पाठवली आहे.एम.आय.डी.सी.मधील प्लॉट नं.सी १/२मध्ये अनधिकृतपणे कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची उत्खननाबाबत परवानगी न घेता अंदाजे ११०० ब्रास मुरूम उत्खनन केल्याबाबत पंचनामा करण्याचे आदेश गाव कामगार तलाठी तासवडे यांना केले होते.यावरून सदरचा पंचनामा कराड महसूल कार्यालयाकडे गावकामगर तलाठी तासवडे यांनी सादर केला होता.यावरून तासवडे ता.कराड येथील प्लॉट नं.सी.१/२मध्ये ११०० ब्रास माती व मुरूम उत्खनन केल्याबाबत ७६४ रुपये गौण खनिजाचे प्रतिब्रास बाजारी मूल्य पकडून रॉयल्टी प्रतिब्रास ४०० रुपये प्रतिब्रास प्रमाणे बाजारमूल्याच्या पाचपट दंडाची रक्कम रु.३८२०५०० असे मिळून एकूण दंडाची रक्कम रु.४२६०५०० दंडाच्या रक्कमेची नोटीस जयहिंद चिलिंग मिल्क प्रोसेसिंग ली.यांना कराड तहसीलदार यांनी बजावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,तासवडे ता.कराड येथील एमआयडीसीतील  भोंगळ कारभार अवैद्य उत्खननाने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी १० आँगस्ट रोजी डोंगर पायथ्यालगत झालेल्या उत्खननाचा महसूल विभागाने पंचनामा केला असून सुमारे १००० ते ११०० ब्रास मुरुम पूर्वपरवानगी शिवाय येथून उचलुन त्याच प्लाँटमध्ये सपाटीकरण करण्यात आले आहे.दरम्यान एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन  करुन अनेकजण मालामाल झाल्याची खमंग चर्चा औद्योगिक वसाहती परिसरात सुरू असून एमआयडीसी प्रशासन मात्र निवांत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

      

तासवडे ता.कराड येथील एमआयडीसीत  मुरुम उपसा झाल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सोमवार दि.१० आँगस्ट रोजी तासवडे येथील तलाठी,कोतवाल यांनी पंचासह उपसा झाल्याच्या ठिकाणी पाहणी केली. सुमारे तीन ते चार एकरमध्ये मुरुम उत्खनन व सपाटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. येथे एक हजार ते अकराशे ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे. एमआयडीसीतील प्लाँट नं सी १/२  सदर पंचनामा करण्यात आला असुन सदरचा प्लाँट जयहिंद चिलींग मिल्क प्रो. या नावाने आहे. तसेच सदर प्लाँटच्या  जागेतच सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र संबंधितांनी याबाबत कोणतीही पुर्वपरवानगी घेतली नसल्याने पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. 

 

कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीही वराडे,तळबीड व तासवडे गावच्या मध्यवर्ती असणाऱ्या डोंगर पायथ्यालगत झाली आहे. एमआयडीसीचा बहुतांश भाग सपाट जमीनीचा आहे. काही भाग चढ उताराचा तसेच डोंगर पायथ्याचा आहे त्यामुळे पायथ्यालगत उद्योग व्यवसाय उभारताना सपाटीकरण करावे लागते  संबंधित उद्योजक त्याच प्लाँटमधून उत्खनन करुन सपाटीकरण करणार असल्यास पुर्व परवानगी घ्यावी लागते मात्र अनेकांनी याबाबत कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. यातूनच तासवडे एमआयडीसीतील अवैद्य मुरुम उपाशांचा गोरख धंदा सुरू झाला असून गेल्या अनेक वर्षापासून जेसीबी, पोकलँडच्या साहय्याने मुरुम उपसा करुन तो हजारो रुपयांना विकला जातो. त्यामुळेच डोंगर पायथ्यालगत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर  मुरुम उपसा झाल्याचे चित्र आहे. एमआयडीसीतील स्थानिक प्रशासनाकडून याबाबत आजतागायत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पडद्यामागून या अवैध उपशाला त्याचा वरदहस्त असल्याचे बोलले जात असून यातून अनेकजण मालामाल झाल्याची खमंग चर्चा औद्योगिक वसाहत परिसरात सध्या सुरू आहे.

 

 

तासवडे औद्योगिक वसाहतीत प्लॉट नं.सी १/२ यामध्ये उत्खनन केले बाबत जयहिंद चिलिंग मिल्क प्रोसेसिंग ली.यांना सदरची नोटीस दिलेली आहे.यामध्ये त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत ३ दिवसांचा अवधी सदर नोटीस मध्ये नमूद केलेला असून याबाबतची सुनावणीची तारीख सुद्धा दिलेली आहे. या तारखेला जयहिंद चिलिंग मिल्क प्रोसेसिंग ली.यांच्याकडे सदर उत्खननाबाबत असणारे शासन परिपत्रके, अध्यादेश याच्या तपासणी व पडताळणी नंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

 

अमरदीप वाकडे

कराड तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अंदाजे पंचनामा नको प्रत्यक्ष मोजणी व्हावी..!

तासवडे औद्योगिक वसाहतीतील अंदाजे ११०० ब्रासचा पंचनामा केला आहे.परंतु वास्तविक उत्खनन हे अतिशय मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष मोजणी करून किती उत्खनन झाले आहे याचे मोजमाप होऊन दंड आकारणी व्हावी अशी चर्चा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात होत आहे.जयहिंद चिलिंग मिल्क प्रोसेसिंग ली.यांनी सी १/२ या औद्योगिक वसाहतीतील प्लॉट मध्ये केलेल्या उत्खननाची रीतसर मोजणी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.