सोलापुरात करोनाचे सहा बळी

सोलापुरात करोनाचे सहा बळी

सोलापूर/ महेश गायकवाड

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असलेल्या सोलापुरात शुक्रवारी एकाच दिवशी एका करोनाबाधित पोलीस हवालदारासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यु पावणाची संख्या रोज एक दोन अशी होती पण काल तब्बल एकाच दिवशी सहाजण मरण पावल्या मुळे सोलापूर शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यासह मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. २८ नव्या रूग्णांची भर पडल्यामुळे एकूण रूग्णसंख्या ५१६ झाली आहे. मात्र यापैकी २२४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या २८ रूग्णांमध्ये एक पुरूष पंढरपूर तालुक्यातील उपरी या गावचा राहणारा आहे. तो मुंबईहून गावाकडे परत आला होता. त्यानंतर त्याला करोनाबाधा झाल्याचे आढळून आले.

आज शुक्रवारी एका महिलेसह सहा जणांचा करोनाने बळी घेतला. यातील बहुसंख्य मृत हे वृध्द आहेत. यात एक मृत (वय ६४) सांगोला तालुक्यातील पाचेगावचा राहणारा आहे. त्यास १८ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा २० मे रोजी मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणीत त्याला करोनाची बाधा झाली होती, हे दिसून आले.

तर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस हवालदाराला (वय ४६) प्रकृती बिघडल्याने कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता काल गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणी अहवालानुसार त्याला करोनाची बाधा झाली होती. हुतात्मा कुर्बान हुसेन झोपडपट्टीत राहणाऱ्या एका पुरूषाचा (वय ५८) काल मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भवानी पेठेतील मराठा वस्तीत राहणाऱ्या ५८ वर्षाच्या वृध्द महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला. सलगर वस्तीतील एका ५६ वर्षीय पुरूषासह तेलंगी पाच्छा पेठेतील ७२ वर्षाच्या वृध्दाचा करोनामुळे बळी गेला आहे.