प्रदूषणाची समस्या

जगभरातील संशोधकांनी २०१० च्या आकडेवारीवर केलेल्या अभ्यासाप्रमाणे आशिया खंडामध्ये तीन लाख लोक वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात.

प्रदूषणाची समस्या

वाढते शहरीकरण हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनला आहे. खेड्यात रोजगार मिळत नाही, शेतीचे उत्पन्न जेमतेम आहे. अशा बिकट अवस्थेत प्रत्येकजण शहराकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. परंतु या शहरांमध्ये प्रदूषणाचा अदृश्य सापळा आहे आणि त्यात मानव अडकत आहे. सध्या विविध प्रदूषणांनी शहरे पोखरली असून त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन संकुचित न व्यापक कृतीकार्यक्रमाचा ठेवावा लागणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा (जागतिक आरोग्य संघटनेचा) अहवाल फारसा आशादायक नाही. त्यामुळे मानवाने वेळीच जागे झाले नाही तर भवितव्यात पर्यावरणाची व सजीवांचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीति आहे. भारतातील प्रमुख शहरांत प्रदूषणाने गंभीर पातळी ओलांडल्याने सजीवांचे आरोग्य चिंताजनक बनल्याचे हा अहवाल सांगतो. याची गंभीर दखल घेऊन उपाय करणे, हे मानवासमोरील गरज आहे.

जगभरातील संशोधकांनी २०१० च्या आकडेवारीवर केलेल्या अभ्यासाप्रमाणे आशिया खंडामध्ये तीन लाख लोक वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. मानवी शरीरातील फुफ्फुसात शिरलेले सूक्ष्म कण व ओझोनमुळे हे प्रमाण वाढले आहे. सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशा धूलिकणांमुळे व या धूलिकणांच्या फुफ्फुसांपर्यंत सहजपणे होणाऱ्या प्रवेशामुळे अर्धांगवायू, हृदयरोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. २०१२ साली केलेल्या मूल्यांकनानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निष्कर्षाप्रमाणे घरातील व घराबाहेरील वायुप्रदूषणामुळे २०१८ मध्ये सात लाख लोक हे सरासरी वयोमानाच्या अगोदर मृत्युमुखी पडले. आजवर भारतामध्ये सहा लाख पंचेचाळीस हजार अकाली मृत्यू हे केवळ हवेच्या प्रदूषणामुळेच झाले. याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. जर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्यावर उपाययोजना करणे सरकार व समाजाची जबाबदारी आहे.

शहरी परिसरातील हवेची गुणवत्तादर्शक फलकाची, हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या मोबाइलअॅपची आवश्यकता आहे. लोक सर्वत्र हे पाहू शकतात. सकाळी व्यायाम करताना, धावताना आपली ऊर्जा खर्च झाली, किती वजन घटले याचा हिशेब ठेवणारे अॅप लोक वापरतात. मग प्रदूषणमापक अॅप वापरायला काय हरकत आहे. आशिया खंडात आणि चीन, भारत व पाकिस्तानमध्ये हवेचे प्रदूषण सर्वांत मोठे असण्याचे कारण म्हणजे, आपले खनिज तेलावर व कोळशावर ऊर्जानिर्मितीसाठी असलेले अवलंबित्व आहे. पारंपरिक पद्धतीने ऊर्जानिर्मितीमुळे हवेत कार्बनडाय ऑक्साॅइड, कार्बनमोनाक्साॅइड तेच कार्बनचे कण निर्माण होऊन यातून हवेचे प्रदूषण वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या ज्वलनक्रियेने हे सूक्ष्म कण हवेमध्ये पसरतात. स्वच्छ उर्जेचा आग्रह समाज व सरकारने धरला पाहिजे, त्या निर्णयाची अमलबजावणी केली पाहिजे. अजूनही अनेक ठिकाणी वृक्षतोड करून लाकडे जाळून त्यावर अनेक व्यवसाय करणारे महाभाग आहेत. तर काही ठिकाणी प्लास्टिक जाळून तो कचरा नष्ट करण्याच्या नादात हवेत अनेक घातक वायू पसरत आहेत. रासायनिक कारखान्यात होणारे रसायनांचे ज्वलनही हवेचे प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. धार्मिक सणाच्या निमित्ताने (उदा. होळी) लाकडे जाळली जातात. त्यामुळे देशात किती प्रदूषण निर्माण करतो आहोत, हे मानवाच्या लक्षात येत नाही.   शासनालाही त्याचे गांभीर्य कळत नाही. २.५ मायक्रॉनच्या सूक्ष्म धूलिकणांची निर्मिती ही मुख्यत: ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या, लाकूड व इतर बायोमासच्या ज्वलनामुळे होते. केंद्र सरकारने योजनेद्वारे सर्वदूर गॅस पोहोचवून अशा मृत्यूंपासून ग्रामीण जनतेला वाचविण्याचे काम हाती घेतले आहे. तरीही स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन म्हणून सौर उर्जेच्या पर्यायाचा विचार होण्याची आवश्यकता आहे. सौर उर्जा कार्यान्वित करण्यातील तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी सोडवण्याचे प्रयत्न सरकारने केले तर हवेचे प्रदूषण बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

शेतीची कीटकनाशके व खते, अमोनियाच्या संयोगाने निर्माण होणारे अमोनिअम नायट्रेट व सल्फेटसारखी संयुगे, पशुपालनाच्या अवैज्ञानिक पद्धती यातून निर्माण होणारे ग्रीन हाऊस गॅसेस या सर्वांचा हवेच्या प्रदूषणात मोठा वाटा आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना त्याला विज्ञान व संशोधनाची जोड देऊन आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. हवेच्या प्रदूषणात मोठी शहरे आणि महानगरे भर घालत आहेत. जगात सर्वाधिक प्रदूषणकारी शहरे भारतात आहेत. मोठ्या व आधुनिक शहरांची बेसुमार विजेची भूक भागवण्यासाठी वीजनिर्मिती केली जाते, ती बऱ्याचवेळा  प्रदूषणकारी किंवा अतिप्रदूषणकारी प्रकारात मोडते. शहरा-महानगरांमधील होणारी सर्व प्रकारची वाहतूक, मुख्यत: खनिज तेलाचा इंधन म्हणून वापर करणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर या प्रदूषणात भर घालत आहे. नागरी वस्त्यांजवळ असणारे औद्योगिक विभाग औद्योगिक प्रदूषणाला कारणीभूत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाच्या निष्कर्षाने औद्योगिक प्रदूषणाप्रमाणेच घरगुती ऊर्जानिर्मितीसाठी होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यावरही भर दिला आहे आणि शेतजमिनीवरील प्रदूषणाकडे मानवाचे लक्ष वेधून घेतले आहे. अदृश्य अशा धूलिकणांनी आपल्या शरीरात श्वासाद्वारे प्रवेश केल्यावर आपली इतर मृत्यू येण्याची शक्यता तीन टक्क्यांनी वाढते, हृदयरोगात ती दहा टक्क्यांनी वाढते आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये श्वसनविकारांनी मृत्यू येण्याची शक्यता २७ टक्क्यांनी वाढते अशी माहिती एन्व्हायर्नमेंटल हेल्थ परस्पेक्टिव्ह या संशोधन पत्रिकेमध्ये नमूद केली आहे. हवेच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी अपारंपारिक उर्जांचा वापर करणे गरजेचे आहे. तरच मानवाचे जीवन सुसह्य होईल.