कॅबिनेट मंत्री देसाईंच्या वाटेत खड्डे,दगड,गोटे

उंब्रज मल्हारपेठ मार्गाची दुरावस्था पाणीयुक्त खड्डे अपघाताची शक्यता

कॅबिनेट मंत्री देसाईंच्या वाटेत खड्डे,दगड,गोटे

अनिल कदम/उंब्रज

पाटण पंढरपूर राज्य मार्गावरील उंब्रज ते मल्हारपेठ दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.उंब्रज ता.कराड येथील पाटण जाणाऱ्या अंडरपास बोगद्याजवळ होणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार खड्डेमय होणारा रस्ता यामुळे नागरिक वाहनधारक वाटसरू मेटाकुटीला आले आहेत.बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आणि ठेकेदारांची मनमानी त्रासदायक ठरत आहे.मंत्री वारंवार सातारा ते मरळी असा प्रवास करीत असताना याच रस्त्याचा वापर करीत असतात तरीही मंत्री देसाईंच्या वाटेत खड्डे ,दगड,गोटे असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पाणीयुक्त खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नागरिक व्यक्त करीत असून राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही दबाब आता नसताना देसाईंची विकासात्मक दृष्टिकोन कसा असणार याबाबत नागरिकांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे.

पाटण पंढरपूर राज्यमार्गावरील उंब्रज ते मल्हारपेठ मार्गा दरम्यान असणाऱ्या चाफळ फाटा ते उंब्रज दरम्यानच्या रस्त्यावर गत काही महिन्यात दुरावस्थेमुळे रस्त्यांची वाट लागली आहे.संबधित ठेकेदार आजअखेर छोटीमोठी डागडुजी करून वरवरची मलमपट्टी करून शासनासह नागरिकांची फसवणूक करीत होता.परंतु कायमस्वरूपी उपाययोजना कधीही अमलबजावणी केली नसल्याने दुरुस्ती नंतर काही काळातच रस्ते पुन्हा उखडले जात आहेत.यामुळे शासनाचे पैसे लाटून दर्जाहीन काम ठेकरदाराने केल्याची ओरड नागरिक करीत आहेत.याकडे नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री शंभूराज देसाई कसे लक्ष देतात हे पाहावे।लागणार आहे.

राविदीप ढाबा ते पाटण बोगदा उंब्रज येथे राज्यमार्गावर पाण्याचे पाट पावसाळ्यात वाहत आहेत यामुळे खड्डा कुठे आहे हे वाहन धारकांच्या लक्षात येत नसल्याने गंभीर अपघात घडलेले आहे यामध्ये काहीजण कायमचे जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.तर सायंकाळी लागणाऱ्या मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसेस अस्ताव्यस्त पध्दतीने लावल्या जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते यामुळे अपुरा रस्ता आजूबाजूला बेकायदेशीर पार्किंग आणि अस्ताव्यस्त अतिक्रमण केलेली दुकानदारी यामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेऊन वाटचाल करावी लागते.

टपऱ्यांचे वाढते अतिक्रमण 

उंब्रज येथील वीज वितरण कार्यालयाच्या आसपास बेकायदेशीर टपऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.यामुळे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा ते मरळी या जाण्यायेण्याच्या मार्गावरील राज्य मार्गावरील असणारी अतिक्रमणे बांधकाम विभाग हटविणार की त्यांना अभय देणार याबाबत नागरिक आशावादी आहेत.

जिल्ह्यात कमांड राहणार

कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई हे आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात प्रशासनावर वचक असणारे नेतृत्व म्हणून त्याचा धाक आहे.महाविकास आघाडीच्या काळात गृहराज्यमंत्री म्हणून मंत्रिपद सांभाळणारे ना.देसाई यांना बढती मिळाली असून त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती झाली आहे.यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गळचेपी होणारे गृहराज्यमंत्री आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्याला समान न्याय समान संधी या तत्वाने कामकाज पाहावे लागणार आहे.यामुळे कराड उत्तर या लगतच्या मतदारसंघात विकासकामे राबवत असताना कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांचा कस लागणार आहे.