केंद्र सरकारचा 'गोंधळलेला' अर्थसंकल्प - आ.जयंत पाटील

केंद्र सरकारचा 'गोंधळलेला'  अर्थसंकल्प - आ.जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी
     केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला पहिला अर्थसंकल्प 'गोंधळलेला' असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी दिली. या अर्थ संकल्पाने देशाच्या नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल. काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने या संकल्पात उल्लेखही केलेला नाही,असेही त्यांनी सांगितले.                 
      आ.पाटील म्हणाले,नक्की कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचे आहे,याची स्पष्टता या अर्थ संकल्पात नाही. खरंतर  यापूर्वीच्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे, या अर्थसंकल्पात अपेक्षित होते. देशातील महिलांच्या महागाईबद्दल तीव्र भावना असून त्या समजून घेवून निर्मला सीतारामन या महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील,अशी आशा होती. मात्र ती फेल ठरली आहे. या अर्थ संकल्पाने युवा वर्गाचीही निराशा केली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासाच्या इंजिनला गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते,मात्र तसे काहीही झालेले नाही. अर्थमंत्र्यांनी  देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात. मात्र त्यांनी लोकांचा अनुनय करणारे निर्णय घेतलेले दिसते.