चोरटी वाळू जोमात प्रशासन कोमात

तासवडे परिसरातील अवैध धंद्याना कोणाचा वरदहस्त ? ,संबंधित खात्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी ठोस कारवाईची गरज

चोरटी वाळू जोमात प्रशासन कोमात
संग्रहित छायाचित्र

उंब्रज / प्रतिनिधी

 

तासवडे (ता.कराड) येथील क्रष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून पोलीस व महसूल यंत्रणेला हाताशी धरून तासवडे परिसरात सुरू असलेला अवैध वाळू उपसा तर तळबीड परिसरात सुरु असणारा अवैध मुरूम उपशाबाबत (गौण खनिज उत्खननावर) कोणीच काही कारवाई करीत नसल्याने या अवैध धंद्यावर कोणाचाच कसलाच अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे. शासनाच्या लाखो रूपयांच्या महसूलाला चूना लावण्याचा उद्योग या परिसरात राजरोस सुरू असल्याने चोरटी वाळू व गौन खनिज उत्खनन जोमात तर प्रशासन कोमात अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 

तासवडेतील कृष्णा नदीपात्रातील वाळूला व परिसरातील गाळाला (मातीला) जिल्हयात मोठी मागणी आहे. त्यातील सावळ्या गोंधळातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती सर्वज्ञात आहे. तेव्हापासून आजपर्यंत पोलीस व महसूल यंत्रणेच्या वरदहस्ताने सुरु असणारे हे कारनामे सध्या परिसरात चर्चेचे विषय ठरले आहेत.

 

दरम्यान, सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तासवडेसह शिरवडे परिसरातील अवैध वाळू चोरट्यांनी रात्रीच्या वेळेत वाळू चोरून त्यातून महिन्याकाठी लाखो रुपये कमवून आपले उखळ पांढरे करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या काही दिवसापासून तासवडे सह शिरवडे परिसरात कृष्णा नदीपात्रासह ओढ्यात कधी जेसीबी च्या तर कधी मजूरांच्या साह्याने वाळू उपसा करण्याचा सपाटा बिनबोभाटपणे येथे सुरू आहे. शे-पाचशेच्या खर्चात अवैध वाळू विक्रीतून लाखो रूपये मिळत असल्याने वाळू चोरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.महसूल व पोलीस यंत्रणेला या घटनांची माहिती असूनही 'तेरी भी चूप मेरी चूप' या धोरणातून स्वतः ची झोळी भरण्याचा उद्योग येथे त्यांच्या कडून बिनबोभाट पणे सुरू आहे. त्यामुळेच या परिसरात वाळू चोरट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.परिणामी येथील अधिकार्यांच्या दिखाव्याच्या 'पाटील'की'बाबत परिसरात सध्या जोमाने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

 

परिसरात राजकीय मित्रात्तावचे असलेले हितसंबंधाचा फायदा घेऊन हे चोरटे माहीर बनलेले आहेत.तलाठी मंडलाधिकारी यांच्यासह पोलीस यंत्रणेशी राजरोसपणे असणाऱ्या संपर्काचा चांगलाच फायदा हे वाळू चोरटे व त्यांचे बगलबच्चे  उठवताना दिसत आहेत.

 

पोलिसांसह महसूल यंत्रणेला याबाबतची माहिती असून या वाळू चोरांकडून मिळणाऱ्या मंथलीमुळे ते त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस यंत्रणेच्या मोकळ्या 'पाटील'की' च्या चर्चेत भर पडली आहे. पोलीस व महसूल यंत्रणेकडून दिला जाणाऱ्या अप्रत्यक्ष पाठबळामुळे त्यांच्या दैनंदिन कारभारावर ही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणेचे मोहरे दिवसा व  रात्री ही वाळू चोरी करणारे सावज शोधण्यासाठी कारवाई च्या नावाखाली परिसरात घिरट्या घालताना दिसत आहेत. सर्व सामान्य शेतकर्यांना दमबाजी करून शासनाची लाखो रुपयांच्या महसूलाला चूना लावणाऱ्या वाळू चोरट्यांसह संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेवर आता जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालून कडक कारवाई करून संबंधितांना  वठणीवर आणण्याची  गरज आहे.

 

कामाचा दिखावा करणाऱ्यावर कारवाई करणार कोण ?

 

तळबीड पोलीस ठाण्याला १२ गावाचे कार्य क्षेत्र आहे. या गावात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असताना येथील अधिकारी नेहमी वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेताना धन्यता मानतात प्रत्यक्षात मात्र,त्यांच्या कडून कोणतेच ठोस काम होताना दिसत नसल्याची चर्चा आहे. येथील तलाठी व मंडलाधिकारी जास्त काम असल्याचा आव आणतात. त्यांच्या कार्यालयातील उपस्थिती ही नेहमी चर्चेचा विषय आहे. परिसरातील अवैध व्यवसायाकडे नेहमी त्यांची उठबस सुरू असते अशा या पोलीस व महसूल यंत्रणेतील कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असणाऱ्या 'अजरामर' दिवट्यांवर कारवाई करणार तरी कोण असा सवाल सह सामान्य नागरिकांच्यातून उपस्थित  केला जात आहे.

-----------------

साहेब... पोलिस खात्याची प्रतिमा सुधारण्यासाठी हे कराच...

 

नुकत्याच झालेल्या गुटखा तस्करीची व जनावरांच्या तस्करी कारवाईची परिसरात मोठी खुमासदार चर्चा सुरू आहे.गेल्या अनेक वर्षापासून सुरु असणाऱ्या या तस्करीच्या प्रकारावर आत्ताच कारवाई का ? तसेच गेल्या एक वर्षापासून दाखल असलेल्या खूनासह इतर गुन्ह्यांच्या तपासात ढिम्म (कर्तव्य शून्य) कामगिरी असणाऱ्या येथील पोलीसांच्या कारवाईची ही नौटंकी नेमकी आत्ताच कशासाठी सुरू आहे ? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने पोलीस खात्याची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी झोपचे सोंग घेणाऱ्या व कारवाईची टिमकी वाजवणाऱ्या येथील प्रभारींच्यावर कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.