अधिकारी चांगले..! मात्र दिव्याखाली अंधार..!!!

'ऑल इज वेल ' म्हणत वाजवली जाते टिमकी

अधिकारी चांगले..! मात्र दिव्याखाली अंधार..!!!

कराड / प्रतिनिधी

 

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्याला लाभलेले जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, तसेच कराड तालुक्याचे प्रांताधिकारी उत्तम दिघे,कराड उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव असे कर्तबगार अधिकारी लाभले आहेत. मात्र असे म्हणतात की,नेता आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या कर्तबगारीचा शिक्का त्यांच्या हाताखालच्या  कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकी वरून बसत असतो.

 

कित्येक वेळा हे कर्तबगार अधिकारी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून वागत असल्याने, त्यातील काही झारीतील शुक्राचार्य आपला स्वार्थ साधण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा

वापर करून नको ती कामे करण्याची उठाठेव करत असतात.यामुळेच वरिष्ठांना देखील कित्येक वेळा खाली मान घालण्याची वेळ येते. कारण समाजामध्ये अशी ओळख होते की,दिव्याखाली अंधार आहे. अधिकारी चांगला आहे.परंतु त्याचे सहकारी, कर्मचारी हे जर कामचुकार किंवा स्टंटबाजी करणार असतील तर त्या अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

 

कराड तालुक्यातील लॉकडाउन काळातील अनेक घटनांचा उल्लेख करावा लागेल यामध्ये वरकरणी जरी सर्व काही अलबेल वाटत असले तरी समाज मनामध्ये अंतर्गत धुमसत असलेला ज्वालामुखी कधी तरी बाहेर पडणारच आहे.कोरोनामुळे जनता हतबल झाली आहे.सरकारी कर्मचारी म्हणतात आम्ही जीवावर उदार होऊन काम करीत आहे.परंतु त्या मोबदल्यात वेतन सुद्धा मिळत आहे याचा सोयीस्कर विसर आज पडताना दिसत आहे.कोरोना आता आला आहे पण शासनाने पगार देऊन वर्षोनुवर्षे कर्मचाऱ्यांना सांभाळले आहे.यामुळे सरकारवर उपकाराची भाषा शासकीय कर्मचाऱ्यांनी करणे गैर आहे.

 

वाळू चोरी,गुटखा,मटका,अवैध दारू विक्री,खुलेआम सुरू असून वरिष्ठांना 'ऑल इज वेल' सांगण्यात कर्मचारी कुठेही कमी पडत नसून लहान सहान चोऱ्यांचा तर तपास झाल्याचा प्रकार कधीच उघडकीस आल्याचे निदर्शनास आले नसल्याचे नागरिकांचे मत आहे.काही ठिकाणी घडलेल्या गंभीर घटना तसेच चोरीबाबत सगळेच मूग गिळून गप्प बसले आहेत.तर काही ठिकाणच्या काही फाईल अचानक ओपन होऊन क्लोज कधी झाली हे समजलेच नाही,त्याचा तपास पुढे काय झाला दोषी व्यक्ती सापडल्या का? याचे उत्तर नागरिकांना आजतागायत मिळाले नाही.

 

तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू सम्राटांच्या कडून काहींना 'मंथली' मिळते,तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनला पद्धतशीर पणे 'बांधलेले'असते एवढेच नाही तर आर. टी.ओ.,रावसाहेब,यांनाही प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला आम्ही 'भेट' देतो अशा भाषेत हे अवैध वाळू वाहतूक करणारे व यांच्याकडून दरमहिना 'वर दक्षणा' जमा करणारे दलाल बोलत असल्याची चर्चा आहे.अशा बोलण्याने प्रशासनाची इज्जत वेशीवर टांगलेली दिसून येत आहे,दिवसाढवळया वाळूची विक्री होतेय,वाळू साठा करून लाखोची उलाढाल होतेय,वाळू साठा करून लाखोची उलाढाल होत आहे,वाळूचा लिलाव नाही तर वाळू आली कुठून,या गोष्टीचाही वरिष्ठांनी विचार करून योग्य कारवाई करावी, आणि प्रशासनाची होत असलेली बदनामी थांबवावी अशीही मागणी मागणी जनतेच्या वतीने केली जाते आहे.