'लालमाती'त कराड महसुलची 'नुरा' कुस्ती

आण्णासाहेब मालामाल भट्टीचालक कंगाल

'लालमाती'त कराड महसुलची 'नुरा' कुस्ती

'लालमाती'त कराड महसुलची 'नुरा' कुस्ती

आण्णासाहेब मालामाल भट्टीचालक कंगाल

वाममार्गानेे कमविलेल्या पैशाला लोक ‘काळा’ पैसा म्हणून संबोधतात. मात्र कराड महसूल विभागासाठी हा शब्दप्रयोग अपवाद ठरला आहे. महसूल विभागातील प्रत्येक घटकनिहाय हा पैसा वेगवेगळ्या नावाने नावारूपास आला आहे. सध्या कराड तालुक्यात ‘लाल’ मातीचा बोलबाला आहे. येथील महसूल विभागाकडून भट्टी चालकांना साक्षात 'दंडवत' घालावा लागत आहे. ‘माती उपसा परवाना असला तरी कारवाईची टांगती तलवार' मानगुटीवर उगारली जात आहे.यामुळे रॉयल्टी चलन भरताना दिला जाणारा मलिदा आण्णासाहेब कोणाच्या घशात घालतात असा यक्ष प्रश्न ठेकेदार व वीटभट्टी मालकांपुढे उभा राहिल्याने वरकमाईचे गौडबंगाल चव्हाट्यावर आले आहे. 

कराड तालुक्यातील अनेक तरूणांनी बेरोजगारीला उत्तर म्हणून वीटभट्टी व्यवसाय स्विकारला आहे तसेच अनेक तरुणांनी गाळ वाहतुकीसाठी ट्रॅक्टर,ट्रेलर,जेसीबी अशी वाहने वित्तीय संस्थांकडून कर्जाऊ रकमेवर घेतले आहेत.अनंत अडचणींवर मात करत आज हा वीट व्यवसाय कसाबसा तग धरून आहे. यासाठी लागणारी लाल माती, कोळसा, मळी, बगॅस आणि महत्वाचे म्हणजे मजूर यांच्या वाढत्या किंमती वीटभट्टी व्यवसायासाठी  अडचणीच्या ठरत आहेत.त्यात भर पडली आहे, ती महसूल विभागाची. वाळू बंदीनंतर आता वीटभट्टी व्यवयायाकडे महसूल विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. याची सुरूवात अण्णासाहेब यांचे पासून होते. त्यानंतर मंडलाधिकारी म्हणजे सर्कल रावसाहेब. यांच्याकडून वीटभट्टी व्यावसायिकांची वरात माती परवाना मिळवण्यासाठी पोहोचते, ती तहसील कार्यालयात. मग येथे रंगते परवाना नाट्य. या नाट्यात महसूलच्या गौणखनीज विभागापासून ते वरीष्ठ अधिकार्‍यांपर्यत अनेकांचे वग पहायला मिळत आहेत. या परवाना नाट्यातील आकडेमोडीचे गौडबंगाल हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागले आहे.लाल मातीच्या गाळाची रॉयल्टी तर शासकीय नियमाप्रमाणे भरावी लागते.शिवाय परवाना मिळवण्यासाठी अधिकची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे कराड तालुक्यातील शेकडो वीटभट्टी चालक लाखो रुपये कोणत्याही पावतीशिवाय महसूल विभागाला देत आहेत.याचा मोठा फटका महसूल विभागाच्या रॉयल्टीला बसला आहे.कारण असा पैसा शासकीय तिजोरीत जाण्याऐवजी थेट तिसरीकडेच जात असल्याने महसुलाला कात्री लागत आहे. शिवाय सेटलमेंट करून मर्जीतील ठेकेदाराने जादा वजन हातावर ठेवल्याने  पोकलॅन्ड, जेसीबीने अवैध उत्खनन करणारांचे उखळ मात्र पांढरे होत आहे. महसूलच्या तलाठी आण्णासाहेब मंडलाधिकारी यांना वीटभट्टी व्यवसायाची इत्यंभूत माहिती असते. भट्टीवर किती गारेकरी, भटकर आहेत, गाळ कोठून येतो? कसा येतो? शिवाय वीटभट्टी चालवण्यासाठी योग्य त्या खात्याची परवानगी घेण्यात आल्या आहेत का? आदी सर्व माहिती त्यांना अवगत आहे. मात्र, आपल्याला काही माहिती नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न तलाठ्यांपासून ते मंडलाधिकारी करताना दिसत आहेत.

 

‘त्या’ पैशात वाटेकरी कोण कोण?

कराड तालुक्यातील लाल मातीचे गौडबंगाल फार मोठ्या प्रमाणात आहे.आण्णासाहेब ते रावसाहेब यामध्ये न्हाऊन माखून निघाले आहेत. माती उपसा व वाहतूक परवाण्यासाठी टेबला खालून येणाऱ्या रक्कमेचा आकडा हा उरात धडकी भरवणारा आहे. या पैशात तहसील कार्यालयातील वाटेकरी कोण-कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून प्रत्यक्षात हजारो ब्रासचा उपसा करण्यात आलेला व सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर माती उपशात कोण-कोण वाटेकरी आहेत? या चर्चेला तालुक्यात ऊत आला आहे तसेच मसूर सर्कल मधील एक आण्णासाहेब वीटभट्टी मालक व वाहतूक करणारांना सतत साक्षात 'दंडवत' घालायला लावत असल्याचीही मोठी चर्चा पसरली आहे.