खालकरवाडी घटनेचे चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल - उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव

खालकरवाडी घटनेचे चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल - उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव

खालकरवाडी ता. कराड येथे विहिरीवर वीज कनेक्शन घेण्यासाठी  पोल उभे करुन तारा ओढत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला व शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपासून या घटनेविषयी संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू होता. त्यामुळे उद्यापर्यंत खालकरवाडी घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होवून कुणाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली हे कळेल. अशी प्राथमिक माहिती उंब्रज येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव यांनी दिली आहे.

 

    खालकरवाडी  गावच्या हद्दीत शनिवारी २९ जुलै रोजी विहिरी वर विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले. या घटनेला चार दिवस होवून गेले तरी अद्याप घटना कोणाच्या चुकीमुळे घडली याचे उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे युवकाच्या हाकनाक बळीला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला होता.

परमिट बाबत संदिग्धता

 

महावितरण कंपनीच्या नियमानुसार चालू लाईनवर कोणतेही काम करत असताना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परमिट दिले जाते. या परमिटमध्ये नियमावलीनुसार वीज प्रवाह खंडीत करण्याचा व पुन्हा चालू करण्याचा कार्यकाळ ठरलेला असतो. याबाबतच्या सूचना त्या विभागाच्या लाईनमनला दिल्या जातात.खरंच परमिट दिले होते का ? नसेल तर या सुचना फोनवरून कुणी दिल्या? का लाईनमनने मनानेच हा कारभार केला याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.या घटनेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

 

   दरम्यान या अनुषंगाने उंब्रज येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  उद्या पर्यंत नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेच्या अनुषंगाने  पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. तसेच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांनी घटनास्थळी तपासणी केली आहे. सद्यस्थितीत या का कामाला वर्क ऑर्डर दिसून येत नाही. त्यामुळे डिटेल्स घेण्याचे काम चालू आहे. तेथे थेट एमएससीबीच्या लायनवर काम करत होते. तशा पद्धतीने काम करणे अधिकृत नाही. जर नवीन लाइन टाकायची असेल तर पहिल्यांदा पोल उभे करुन कंडक्टर बसवावे लागतात. ते जोडता वेळेस निव्वळ कल्पना देवून नव्हे तर एमएससीबीने अधिकृत नेमलेल्या व्यक्तीने जोडावयाची असते. पण असं दिसून येतंय की दुसरीकडे काम चालू असताना त्यांनी लाइव्ह लायनलाच कंडक्टर जोडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी पलिकडेची लाईन चालू केली तेव्हा तो सप्लाय इथेही आला. वास्तविक असे करण्याची गरज नव्हती असे उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव म्हणाल्या. यासंदर्भात उद्या चित्र स्पष्ट असेही त्यांनी सांगितले. 

 

   खालकरवाडी घटनेत  ऋषीकेश प्रकाश कांबळे वय २७ राहणार केसे पाडळी ता.कराड या युवकाचा शाॅक लागून मृत्यू झाला.  तर या घटनेत  संजय रामचंद्र वीर वय 51,  अमित महादेव कारंडे वय 30  दोन्ही राहणार केसे पाडळी ता. कराड,  तन्मय रविंद्र अडकड वय २४  राहणार आडुळ ता. पाटण हे गंभीर जखमी झाले आहेत.   वायरमन, अधिकारी व कंत्राटदार यांच्यात कम्युनिकेशन नसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा चरेगाव परिसरात सुरू आहे.  कामचुकार यंत्रणेवर कारवाईची मागणी केली जात आहे.