कायदेपंडित हरपला 

कायदेपंडित हरपला 
अॅड. राम जेठमलानी

प्रीतिसंगम / अग्रलेख 

     
ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी नवी दिल्लीतील निवासस्थानी दीर्घ आजाराने ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे खटले लढले. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७ व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली.जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रातांतील शिखरापूर येथे १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बी.ची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली. फाळणी होईपर्यंत जेठमलानी यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली. राम जेठमलानी यांनी आत्तापर्यंत अनेक खटले लढले. विशेष म्हणजे, त्यांनी संशयित दोषींच्या बाजूने खटला लढवल्याचे दिसते. राजीव गांधी हत्या प्रकरण, इंदिरा गांधी हत्या प्रकरण, हाजी मस्तानचा खटला, लालू प्रसाद यांच्या चारा घोटाळा प्रकरणातील खटला, हर्षद मेहताचा खटला इ. नामांकित खटले त्यांनी लढले. राम जेठमलानी हे खूप हुशार वकील, कायदेतज्ञ होते, परंतु त्यांनी नेहमीच दोषी लोकांचा खटला चालवला. राम जेठमलानी यांचे सर्व नेत्यांशी चांगले संबंध होते, हे विशेष. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपला आहे.                                                                                                                                 राम जेठमलानी हे सर्वप्रथम १९५९ मधील के.एम.नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यानंतर प्रकाशझोतात आले. त्यांनी यशवंत चंद्रचूड यांच्यासोबत हा खटला लढला होता. आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येच्या प्रकरणात शिवसेनेकडून वकील म्हणून खटला लढवला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे मारेकरी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांच्या बाजूने कोणत्याही वकीलाने खटला लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर जेठमलानी यांनी हे धाडस करत त्यांच्या बाजूने खटला लढला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे आरोपी वी. श्रीहरन याच्या बाजूने ते सर्वोच्च न्यायालयात लढले होते. २१ मे १९९१ रोजी चेन्नई जवळील श्रीपेरुंबुदूरमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह १९ जणांचा मृत्यू झाला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना लिट्टे या संघटनेने आत्मघातकी बॉंबस्फोट करून ठार केले. त्यामुळे देशात गांधी कुटुंबियांसोबत सहानुभूतीची लाट असताना जेठमलानी यांनी या प्रकरणातील आरोपींच्या बाजूने खटला लढवल्यामुळे त्यांची प्रसिद्धी वाढली. गुजरात येथील सोराबुद्दीन प्रकरणात अमित शाह यांच्या बाजूने जेठमलानी खटला लढले होते. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा खटलाही त्यांनी न्यायालयात लढला होता. जयललिता यांच्यावर उत्पन्नापेक्षा ६६.६५ कोटी रूपयांची अधिक संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांची कन्या आणि खासदार कनिमोझी यांचा खटलाही लढला होता. कनिमोझी यांच्यावर २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात २१४ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.याव्यतिरिक्त त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे वकील म्हणून चारा घोटाळा पकरणी २०१३ मध्ये काम पाहिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने जेठमलानी यांनी माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात मानहानीचा खटला लढला होता. त्यांनंतर खटल्याच्या फी वरून आरोप प्रत्यारोपही झाले होते. संसदेवर हल्ला केलेल्या अफजल गुरूचाही खटला जेठमलानी यांनी लढला होता. त्यांनी अफजल गुरूला देण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी अफजलला आपल्या मर्जीनुसार वकील उपलब्ध करून न दिल्याचा आरोप सरकारवर केला होता. मुंबईचा एकेकाळचा डॉन हाजी मस्तानचे स्मगलिंगशी निगडीत अनेक खटले जेठमलानी यांनी लढले होते. जेसिका लाल हत्याप्रकरणात मनू शर्माकडून जेठमलानी यांनी खटला लढला होता. शेअर बाजार घोटाळा प्रकरणी हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या बचावासाठी ते न्यायालयात हजर झाले होते. २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे आरोपी आसाराम बापूंच्या खटल्यात त्यांच्या बाजूने ते वकील म्हणून उपस्थित होते. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याबाजूने ते सर्वोच्च न्यायालयात खटला लढले होते. राम जेठमलानी त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकवेळा देशात वादग्रस्त ठरले होते.                                                                    राम जेठमलानी यांचे दिल्लीत दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर मान्यवर व्यक्तींनी शोक व्यक्त केला. गेले दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने कायद्याचा अभ्यासक हरपला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदीही जेठमलानी यांची २०१० मध्ये निवड झाली होती. राम जेठमलानी यांनी सहाव्या आणि सातव्या लोकसभेत मुंबईतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांची लोकप्रियता एवढी होती की ते साहजिकच संसदेत निवडून गेले होते. वकिलीबरोबर जेठमलानी यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम पाहिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सरकारमध्ये जेठमलानी यांनी कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून काम केले होते. विशेष म्हणजे, एकेकाळी भाजपाकडून निवडणूक लढवलेल्या जेठमलानी यांनी २०१४ मध्ये लखनौ लोकसभा मतदार संघातून स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ विधिज्ज्ञ जेठमलानी यांच्या जाण्यामुळे देशाने असाधारण वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. जेठमलानी यांनी वकिली आणि संसद या दोन्हींमध्ये योगदान दिले. ते स्वभावाने धाडसी, विनोदी होते. कोणत्याही विषयावर ते बेधडकपणे मत मांडत असत. जेठमलानी यांची विचार मांडण्याची क्षमता अदभूत होती. एक नामांकित, निष्णात वकील व कायदेपंडित म्हणून राम जेठमलानी हे कायमच आठवणीत राहतील.