पक्षांतर स्वविकासासाठी की जनविकासासाठी ?  

पक्षांतर स्वविकासासाठी की जनविकासासाठी ?  

                                                   
संडे स्पेशल / अशोक सुतार

                  पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघाले आहे. कोण कोणत्या पक्षात जातो, जाणार याची चर्चा नाक्यानाक्यांवर होत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक २-३ महिन्यांवर आली आहे. लवकरच आचारसंहिता सुरु होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पूर्वी कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. २०१४ च्या मोदीलाटेत कॉंग्रेस- राष्ट्रवादीची नौका जी भरकटली आहे, ती किनाऱ्यावर येण्याचे नाव घेत नाही. म्हणजे लाटेतच ही  नौका भरकटली असून आगामी विधानसभा येताच अनेक उंदरांनी कल्ला करून नावेच्या बाहेर उड्या मारण्याचे सुरु केले आहे. लाटेत होडी सापडावी आणि अडचणीच्या काळात कप्तानाला सोडून बाकीच्यांनी पाण्यात उड्या मारून दुसऱ्या जहाजाचा आश्रय घ्यावा, यासारखा स्वार्थीपणा पूर्वीच्या नेत्यांमध्ये नव्हता. ज्यांच्याकडे तसा स्वार्थीपणा होता, तेच आता अडचणीत आले आहेत. असो. काळाचा महिमा अगाध आहे. जे पेराल तेच उगवणार ! आज पश्चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. मतदारांनी कोणाला पसंती द्यायची हे मतदार ठरवतील, त्याची चिंता नको. पक्षातून राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य दिले तर लोक तुमच्यावर प्रेम करतील, तुम्हाला निवडून देतील. मतदारांना काहीच समजत नाही, असे समजणे चुकीचे आहे. जे असे समजतात, मतदारांना ग्राह्य धरतात, त्यांनाही लोकांनी निवडणुकीत धडा शिकवल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या भाजप जोशात आहे, शिवसेनेलाही प्रतिसाद मिळत आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीची बरीचशी मंडळी भाजपकडे धाव घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे महाजनादेश यात्रा गेली असता म्हटले होते की, भाजपा आता हाउसफुल्ल झाला असून कोणालाही प्रवेश नाही. परंतु जसजसा भाजपला विरोधकांचा प्रतिसाद मिळू लागला, तेव्हा मुख्यमंत्री मौनात गेले आहेत. आता भाजप कार्यालयाच्या आवारातही बसायला जागा उरलेली नाही, असे म्हणतात. आगामी विधानसभेची चाहूल लागल्यापासून काही राजकीय मंडळी बिथरली असून मतदारांना अजून बराच राजकीय तमाशा पहावयास मिळणार आहे.                                                                                                                                                                            तर विधानसभा जवळ आली आहे आणि राजकीय वाकयुद्ध सुरु झाले आहे. कोण म्हणतो, त्या आमदारांनी नेमके काय काम केले, किती लोकांना रोजगार दिला हे सांगावे. तर कुणी म्हणतो, त्यांना आरोप करण्याची सवयच आहे. ते मर्जीतल्या लोकांनाच रोजगार देतात. कॉंग्रेसमधून काही फुटून गेलेले नेते म्हणतात, आमचं अगोदरच ठरलंय ! काय ठरलंय हे ते नेते दुसऱ्या पक्षात गेल्यावर समजते. मध्यंतरी राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते भाजपवासी झाले. त्यानंतर एक बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होता. आता ते नेते भाजपमध्ये येणार की पक्षातच राहणार, असा घोर नुकत्याच भाजपवासी झालेल्या नेत्यांना लागला आहे. आम्ही आलो आणि आमचा विरोधकही आता भाजपच्या होडीत येणार म्हटल्यावर आम्ही जाणार कुठे, असा चिंतातूर भाव भाजपवासी नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. चिंतातूर चेहरे पाहून तो नेता मनातल्या मनात कितीवेळा तरी हसला असेल ! तर पक्षांतराची अशी गम्मत सुरु आहे. कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीतून ठाम आहेत. परंतु आघाडीतील धैर्यशील कदम हे भाजपमध्ये जाण्याचे मनसुबे रचत आहेत. ते भाजपमध्ये जाणार हे नक्की, आता प्रवेशाची औपचारिकताच काय ती बाकी आहे. धैर्यशील कदम यांना मानणारा मोठा गट उत्तरेत कार्यरत आहे. ते भाजपमध्ये नेमके कशासाठी जात आहेत, यावर आता चर्चा सुरु आहे. पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि आता भाजपची उमेदवारी ज्यांना मिळणार आहे ते मनोज घोरपडे यांच्याबद्दल चर्चा सुरु आहे. म्हणजे ते भाजपमध्येच राहणार आहेत. परंतु नव्याने पक्षात आलेल्या धैर्यशील कदमांचे पुनर्वसन नेमके कुठे करायचे की त्यांनाच थेट विधानसभेचे तिकीट द्यावे, याचा विचार भाजपचे नेते शेखर चरेगावकर करत असतील. ना. चंद्रकांतदादा यांनी तर घोरपडेंनाच भाजपचे तिकीट देणार असल्याचे महावचन दिले आहे. तर भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांमुळे विधानसभेत नेमकी कुणाला संधी द्यायची, या पेचात नेते असावेत. पूर्वेला माण तालुक्यातील कॉंग्रेसचे हुकमी आमदार जयकुमार गोरे हे त्यांचे मित्र भाजपचे  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पावलावर पाऊल टाकून भाजपवासी झाले. लोकसभा निवडणुकीत गोरे यांनी आपण कॉंग्रेसमध्ये आहोत हे विसरून रणजितसिंह निंबाळकरांना बरीच मतांची रसद पुरवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी गोरे भाजपचा रस्ता धरणार, हे त्यांचे अगोदरच ठरल्याचा प्रत्यय काँग्रेसवाल्यांना आला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कॉंग्रेसचे सातारा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष होते. त्यांचे नशीब एवढे चांगले की, यापूर्वी कोणतीही मोठी निवडणूक न लढवता ते थेट माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार झाले. असते एकेकाचे नशीब ! त्यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर हेही असेच अचानकारीत्या शिवसेनेचे खासदार झाले होते. वाईमध्ये कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदन भोसले हे नुकतेच भाजपवासी झाले. किसन वीर साखर कारखान्यात त्यांचे वजन आहे म्हणे ! नुकतीच एक बातमी वाचली. त्यात असे म्हटले होते की, सदर साखर कारखान्यातील कामगारांनी मदन भोसले यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणाची निर्मिती करण्यासाठी तर अशा बातम्या पेरल्या जात नसतील ? अशी शंका मनात येऊन गेली.                                                           काहीही असो. शत प्रतिशत भाजपची संकल्पना महाराष्ट्रात साकारत असल्याचे दिसत आहे. भाजपला राज्यातून मिळत असलेला प्रतिसाद पाहता भाजपच्या नेत्यांनी, आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२३ जागा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीची काहीच हालचाल दिसत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवासारखे थंड वातावरण तयार झाले आहे. कॉंग्रेसमध्ये शुकशुकाट झाला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काही दिवस राहुल गांधी यांच्या राजीनाम्याच्या नाटकातच विधानसभा निवडणूक केव्हा उगवली, हे समजलेच नाही. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी नुकतीच दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात बाबांनी युवा संवाद मेळावा घेतला होता. त्याला महाविद्यालयीन युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बाबांनी दुसऱ्या कुणाची वाट न पाहता प्रचाराला सुरुवात केली आहे. गेली पाच वर्षे बाबांनी कराड दक्षिण मतदारसंघातील सर्व गावांशी संपर्क साधला आहे. कराड दक्षिणमध्ये अतुल बाबा भोसले यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहतील असे वाटत नाही. तर त्यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर यांच्याविरोधात लढत होईल. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथील मतदारसंघात राजकीय रणनितीमध्ये बदल होणार आहे. इचलकरंजी येथे ना. सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते राजू शेट्टी यांनी कडकनाथ घोटाळ्याचे आरोप केले आहेत. ही विधानसभा निवडणूक त्याच मुद्द्यावर लढली जाणार आहे काय, असा प्रश्न तेथील मतदारांना पडला आहे.                                                                                                                                                                                                               राजकारण जेवढे उगळाल, तेवढे उजळत असते. अनेक नेते इकडून तिकडे जात आहेत. परंतु कॉंग्रेस- राष्ट्रवादीत जाणारा नेता कुणी सापडत नाही, हे विशेष आहे. भाजपची सध्या चलती आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीत नेत्यांच्या नेहमी एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरु होत्या. विशेष म्हणजे, त्यामुळे कुरघोड्या करणारे नेतेच एकमेकांवर वैतागले होते. अशा वातावरणात भाजपमध्ये सर्व विरोधी पक्षांतील नेते गेल्यानंतर तिथेही कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षांसारखी अवस्था होऊ नये म्हणजे झाले ! राजकारण, प्रेम आणि युद्धात सर्व काही माफ असते, असे म्हणतात. एक बाब मात्र स्पष्ट करावीशी वाटते की, भाजपमध्ये गेल्यानंतर नेते विकासाचे काम दुप्पट वेगाने करणार आहेत काय ? तर या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नाही असे आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षात ३५-४० वर्षे एकनिष्ठ राहून मोठे समाजकारण केले, ते इतरांना जमणार नाही काय ? गयाराम नेत्यांना विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षांची निकड केव्हापासून वाटू लागली ?