दादांचे नेतृत्व आणि प्रगती

karad

दादांचे नेतृत्व आणि प्रगती

दादांचे नेतृत्व आणि प्रगती


कृष्णेत 1989 ला संत्तांतर झाले. आणि यशवंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेल सत्तेत आले. कृष्णेची धुरा भाऊंनी आपले पुतणे मदनराव मोहिते यांच्या खांद्यावर दिले. कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली. मदनराव मोहिते हे धाडसी नेतृत्व निर्णय घेताना कशाचाही विचार करत नव्हते. शेतकरी सभासद हा कारखान्याचा मालक आहे हे भाऊंचे वाक्य मदनदादांनी आपल्या कार्यकिर्दीत पहिल्यापासून राबयाला सुरूवात केली.

1989 ते 1994 हा त्यांचा पहिला चेअरमन पदाचा टप्पा कृष्णाकाठी चांगलाच रूजला. ज्या गावच्या यात्रा असतील त्या गावांना बिल देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. कारखान्याचा कारभार ते एकीकडे करत होते. तर दुसरीकडे भाऊंनी कारखान्यात नियोजन मंडळ स्थापन केले होते. त्याचे कामकाज कारखान्याच्या परिसरातच सुरू होते. नियोजन मंडळात स्वतःभाऊ बसुन असायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली   आणि मदनदादांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने काही प्रोजेक्ट हाती घेतले.

त्यामध्ये कारखान्यात पहिल्यांदा अ‍ॅसिटोन प्रकल्प उभारला. त्या पाठोपाठ भाग निहाय गट ऑफिसची निर्मिती करायचा निर्णय घेतला. तातडीने जागा उपलब्ध केल्या आणि प्रत्यक्ष बांधकामालाही सुरूवात केली. शेतकरी सभासदांना साखर नेण्यासाठी, ऊसाची नोंद करण्यासाठी आणि इतर कामासाठी कारखान्यापर्यंत यायला लागू नये. त्यांची कामे या विभाग कार्यालयातून व्हावे हा मुख्य उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता. एकीकडे मदनदादा या कामात गुंतले होते. तर दुसरीकडे भाऊंनी कृष्णा एक अभ्यास भाग १  ही पहिली पुस्तीका काढली आणि त्या नंतर दुसरी पुस्तीका काढली. याचे कामकाज नियोजन मंडळातून होत होते. अभ्यासपूर्ण अशी बनवलेली ही पुस्तीका शेतकरी सभासदांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. तर हे कामकाज सुरू असतानाच डीआयजी हा जगातला पहिला प्रकल्प पायलट स्वरूपी कृष्णेला व्हीएसआयने दिला आणि तो उभारलाही. त्याच बरोबर जिल्हा बँकेकडून इतर सहकारी साखर कारखाने कर्ज घेठत होती पण कृष्णा हा एकमेव कारखाना जिल्हा बँकेकडून व्याज घेत होता. व हे व्याज जेष्ठ सभासदांच्यासाठी पेन्शन योजनामधे वाटप केले जात होते. हा ही मोठा इतिहास या कालखंडात घडला.

नियोजन बद्ध काम केल्यानंतर कारखाना प्रगतीत येवू शकतो याचे हे उदाहरण ठरले. कृष्णेमध्ये होत असलेले हे बदल सभासदांना पटवून सांगण्यामध्ये मदनदादा सात्यत्याने यशस्वी होत होते. वार्षिक सर्वसाधारण सभा मधून भाऊ-दादांची भाषणे ही कारखान्याची प्रगती सभासदांच्यापर्यंत पोहोचवत होती. लोकांचा मदनदादांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला होता. शेतकरी सभासदांच्या सुख-दुःखामध्ये मदनदादा सहभागी असत. मग कोण्याच्या घरचे लग्नकार्य असेल आणि पत्रिका आली तर मदनदादा शक्यतो टाळत नव्हते. तो सभासद मोठा आहे की लहान आहे याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. सर्वसामान्य शेतकार्‍यांच्या सुखात सहभागी होणे जसे आपले कर्तव्य आहे तसेच दुःखाच्या प्रसंगातही ते कृष्णेच्या कार्यक्षेत्रात सातत्याने भेटी देत असत. यामुळे दादांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सभासदांचा आपला नेता म्हणून झाला. कारखान्याच्या प्रशासनावर त्यांची मोठी पकड होती.

ज्यावेळी ते कारखान्यात येत त्यावेळी त्यांच्या भोवती कार्यकत्यांची गर्दी असल्याचे पहायला मिळत होते. त्यांच्या परस्पर त्यांना भेटण्यासाठी कोणी आले होते का? याची नोंद करण्यसाठी काही कर्मचार्‍याची नियुक्ती केली होती. येणार्‍या सभासदांना आल्याआल्या चहा द्यायचा मग त्यांच्या कामाची चर्चा करायची अशी त्यांची पद्धत होती. 1989 ते 1994 भाऊंचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रतिमा तयार करण्यात दादांनी कसलीही कसर सोडली नाही. 1994 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा सहकार पॅनेल आणि रयत पॅनले असा संघर्ष उभा ठाकला. कारखान्यात झालेल्या कारभारावर आप्पा आणि सुरेशबाबा मार्गदर्शन करत होते.  तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भाऊंच्या बरोबरीने दादा होते. दादा पाच वर्षाच्या कालखंडात कारखान्याने केलेल्या प्रगतीचा आलेख सांगत होते. मदनदादा या निवडणूकीतही आक्रमह होते. त्यामुळेच 1994 मध्ये पुन्हा एकदा रयत पॅनेल निवडून आले. आणि दादा चेअरमन झाले. मदनदादांची दुसरी टर्म सुरू झाली. 1994 ते 1999 हा कालखंडही त्यांनी कारखान्याची प्रगती करण्यात घालविला. मात्र पुन्हा एकदा 1999 च्या निवडणूकीत संघर्ष उभा राहिला. सहकार पॅनेल आणि रयत पॅनेल हे एकमेकासमोर उभे राहिले. निवडणूकीचा फड गाजू लागला. सभाही गाजत होत्या आणि आरोप प्रत्यारोपही होत होते. दहा वर्षाच्या कालखंडात कारखान्याचा लेखाजोेखा चांगल्या पद्धतीने भाऊ-दादा सांगत होते. तर कारखान्यावर आप्पा आणि सुरेशबाबा सडकून टिका करत होेते. याचा परिपाक उद्याच्या भागात.