आणि कृष्णाकाठ दुमदुमला.....

आणि कृष्णाकाठ दुमदुमला.....

आणि कृष्णाकाठ दुमदुमला.....


कृष्णाकाठावर उभा राहिलेला संघर्ष हा दोन भावांतील होता. त्यातील एकजण होते महाराष्ट्राचे विचारवंत यशवंराव मोहिते भाऊ तर दुसरे होते सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा. या दोन भावांतील संघर्षाची ठिणगी ही कारखानाच्या माध्यमातून उभारलेल्या पुरक संस्थांचे खाजगीकरण थांबवण्यासाठी भाऊंनी हाक दिली. आणि कृष्णाकाठ दुमदुमु लागला.

कारखाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा...! या आरोळीने वार्षिक सभेच्या ठिकाणी गदारोळ झाला. गदारोळात पार पडलेली ही वार्षिक सभा आणि त्यानंतर कृष्णाकाठी घडलेले हे कुरूक्षेत्र चांगलेच स्मरणात राहिले.वार्षिक सभेच्या गोंधळानंतर कृष्णाकाठी रयत संघर्ष मंचने लढा पुकारला. कृष्णाकाठी सख्खे भाऊ, पक्के वैरी झाले. कृष्णा कारखान्याची वार्षिक सभा ज्या पद्धतीने गाजली तशीच दुसरी सभा मयूर सहकारी कुकुट्ट पालन संस्थेची गाजली. कारण सभा सुरू झाली होती. आप्पांचे भाषण सुरू होते. अचानक या ठिकाणी जीप मधुन मदनराव मोहिते यांचे आगमन झाले त्यांनी गाडी थेट सभास्थळापर्यंत आणली. गाडीतून ते खाली उतरल्यानंतर त्यांंना अडवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी हवेतच गोळीबार केला. सभास्थळी गोंधळ उडाला. जमलेले शेतकरी सभासद सैरभैर पळू लागले.

आप्पा मात्र सभास्थळी उभे राहून शांततेचे आवाहन करत होते. असा संघर्ष यापूर्वी कधीच झाला नव्हता. कारखान्याची निवडणूक जसजसी जवळ येवू लागली तसतशा प्रचाराच्या सभा सुरू झाल्या. भाऊंनी गावोगावी सभा घेण्यास सुरूवात केली. त्याला प्रतिउत्तोर देण्यासाठी आप्पानीही सभा सुरू केल्या. प्रचाराच्या ऐनरंगात अश्या थोर नेत्यांची भाषणे ऐकल्यानंतर वृत्त प्रसिद्ध करताना मोठी अडचण व्हायची. भाऊंच्या सभेला उपस्थित राहिले तर भाऊ खरे बोलतायत असे वाटायचे ही बातमी प्रकाशित झाली की दुसर्‍या दिवशी आप्पांच्या सभेला जायचे. आप्पांचे भाषण ऐकले ही आप्पा खरे बोलत आहेत. अशी वकृत्त्वावर पकड असलेली आणि सर्व शेतकर्‍यांना आपल्या भाषणाने आपलसं करणारी ही थोर मंडळी या निवडणूकीच्या रंणांगणात प्रचाराच्या सभा गाजवत होती. त्यांच्या सभांनाही मोठी गर्दी व्हायची. अशातच आप्पांच्या बाजूने कराड दक्षिणचे तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी प्रचाराच्या सभेत सहभाग घेतला आणि कृष्णाकाठ दुमदुमु लागला.


आम्ही मोजके चार-पाच पत्रकार होतो. ज्यांची सभा असायची त्यांच्याकडून पत्रकारांना नेण्यासाठी गाडी यायची. मला आठवते शेणोली येथे भाऊंची सभा होती. भाऊ भाषण करायला उभे राहिले आणि त्यांनी कारखान्याच्या कामकाजावर सडकुन टिका करत आमचा भाऊ कसा चुकीचा वागला याचा अक्षरक्षः इतिहासच उभा केला. आप्पांच्या बरोबर त्यांनी काकांच्यावरही टिकास्त्र सोडले. भाऊ परखड विचाराचे कशाचीही मुला इजा न ठेवता ताडफाड बोलत असे. या आमदाराची--- सालटी काढली पाहिजे अशी जोरदार टिका केली. त्यांनी केलेल्या भाषणानंतर परिसर दुमदुमुन गेला. यानंतर विलासकाका आणि आप्पांची सभा बेलवडे येथे होती. या सभेलाही आम्ही दुसर्‍या दिवशी गेलो. या ठिकाणी ग्रामस्थांनी झांज पथक, ढोलताश्या लावत गावाच्या वेशीपासून सभास्थळापर्यंत या दोन नेत्यांना वाजवत-गाजवत नेले. सभा सुरू झाली आणि आप्पा तसे हसतमुख कधीही चेहर्‍यावर नैराश्य नाही. निखळ हसत त्यांनी भाऊंच्या टिकेला प्रतिउत्तर दिले. आणि काका भाषण करायला उभे राहिले त्यांनी भाऊंच्या त्या वाक्यावर जोरदार प्रतिउत्तोर देत तुमच्या हिम्मत असेल तर हायवेच्या वर येवून बोला, तुमचे काय होते ते बघा, माझ्यावर प्रेम करणारे फार आक्रमक लोक आहेत, असे सांगून शेलक्या शब्दात टिका केली आणि या विचारवंताचे विचाराचे गाठोळे, कृष्णेच्या डोहात बुडवा, अशी टिका केली.

त्यानंतर ओंड येथे सभा झाली. आणि ओंडच्या सभेत भाऊंनी, माझ्या विचारांचे गाठोळेे कृष्णेच्या डोहात बुडविले तरी तुकारामांच्या गाथेप्रमाणे ते वरती येईल असे प्रतिउत्तोर दिले. हा विचाराचा संघर्ष आणि शेतकरी सभासदांना आपलेसे करण्याचे वकृत्व हे भाऊ-आप्पा या दोन भावांच्यात होते. या कृष्णाकाठी होणार्‍या या सभा या ऐतिहासिक होत्या अशा थोर नेत्यांचे विचार प्रगल्भ होते. आणि ते ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य होते. अशा या दोन मातंबर नेत्यांनी सभांचे फड रंगविले आणि 1989 च्या निवडणूकीला सामोरे गेले.