कृष्णाघाट पोलीस चौकीसाठी 15 ऑगष्टला उपोषण  

कृष्णाघाट पोलीस चौकीसाठी 15 ऑगष्टला उपोषण  

 

 

दादासो शिंगण यांचा इशारा

कराड/प्रतिनिधी :

              कृष्णा-कोयनेचा संगम, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी, प्रीतिसंगम उद्यान, कृष्णामाई मंदिरासह अन्य मंदिरे यांमुळे कराड हे एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे येथे नेहमीच मोठी गर्दी होत असून याठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी याठिकाणी पोलीस चौकी व्हावी, अशी मागणी करून त्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. मात्र, त्याकडे नगरपालिका, पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने 15 ऑगष्ट रोजी कृष्णाघाट येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मलकापूरचे माजी नगरसेवक व मनसेचे तालुकाध्यक्ष दादासो शिंगण यांनी दिला आहे.                                                                                                                             त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णाघाट पोलीस चौकी व्हावी, यासाठी नगरपालिकेला 5 एप्रिल 2018 रोजी शिंगण यांनी निवेदन दिले होते. त्याला नगरपालिकेकडून 10 जुलै 2019 रोजी केवळ उत्तरपत्र देण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात नगराध्यक्षा, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस प्रमुखांनाही निवेदन देण्यात आले होते.                                                                                                                     कृष्णामाई घाटावर दररोज शाळा, महाविद्यालयीन मुले, नागरिक, पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु, याठिकाणी भरधाव वेगाने गाड्या चालवणे, बागेत प्रेमी युगुलांचा दंगा, छेडछाड, पर्यटकांसमोरच अश्लील चाले सुरु असतात. याबाबत येथील सुरक्षारक्षकाने हटकल्यास त्यांना दमदाटी, मारहाण करणे, महाविद्यालयीन युवकांची बाईक रेसिंग, स्टंट, भांडण-तंटा, मारामाऱ्या असे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे याठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नदीपात्रालागत मध्यपान करणे, नदीच्या पाण्यात गाड्या धुणे, पाणीपताळी जास्त असताना पाण्यात पोहणे, हुल्लडबाजी करणे असे प्रकारही चालू असतात. याबाबत नगरपालिका, पोलीस प्रशासनाने सावधानता बाळगणे गरजेचे असून त्यासाठी येथे पोलीस चौकी उभारण्याची नितांत गरज आहे.     मात्र, पालिकेकडून पोलीस चौकी उभारण्याबाबत केवळ कागदोपत्री तरतूद करण्यात आली असून याची प्रत्यक्ष कार्यवाही होणे गरजेचे आहे. परंतु, वेळोवेळी निवेदने देऊनही या पोलीस चौकीसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. पालिकेकडून कृष्णाघाट पोलीस चौकीबाबत लगेच अंमलबजावणी करण्यात येईल, असे पत्र देण्यात आले होते. मात्र, तसे न झाल्यास त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला होता. त्यानुसार शिंगण यांनी त्यामुळे 2 ऑगष्ट रोजी पुन्हाएकदा पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस प्रमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी अध्यापही पोलीस चौकीबाबत कोणतीही कार्यवाही केल्याने 15 ऑगष्ट रोजी कृष्णा घाटावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.