कोयनेश्वर मंदिराला महापुराचा तडाखा

कोयनेश्वर मंदिराला महापुराचा तडाखा

 

कराड/प्रतिनिधी :

             कृष्णा-कोयना नदीला आलेल्या महापुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये येथील संत तुकाराम हायस्कूलजवळ असणाऱ्या कोयनेश्वर मंदिरालाही कोयना नदीच्या पुराचा तडाखा बसला असून त्यामध्ये मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. मंगळवारी या भागातील पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर मंदिराचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
             कोयनेश्वर मंदिर हे शहरातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक असून काही महिन्यांपूर्वीच मंदि व परिसराचे शुशोभीकरण करण्यात आले होते. परंतु, कोयना नदीला आलेल्या महापुरात या कोयनेश्वर मंदिरावर झाड कोसळून मंदिराचे नुकसान झाले आहे. या महापुरामुळे व झाड कोसळल्यामुळे मंदिराराच्या संरक्षक भिंतीचीही मोठी पडझड झाली आहे. तसेच या परिसरातील सुमारे 15 ते 20 झाडेही उन्मळून पडली असून यामध्ये मंदिरालतचे 50 वर्षाहून जुने वडाचे झाडही पडल्याने भाविकांकडून हालहाल व्यक्त होत आहे. त्याचबरोबर येथील विजेचा खांबही पुरामुळे वाकला आहे. मंगळवारी या भागातील पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर हे संपूर्ण  नुकसान उघडकीस आले असून पुरामुळे मंदिर परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
         शहरातील महापुराची परिस्थिती निवळल्यानंतर विविध ठिकाणी चिखल, कचरा, साचलेल्या पाण्याची दुर्गंधी निर्माण झाली होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासन, शहरातील दक्ष नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत नुकतीच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाची स्वच्छता करण्यात आली होती.
        परंतु, सध्या श्रावण महिना सुरु असून शहरातील विविध मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. मात्र, मंदिर परिसरात साचलेल्या चिखल, कचरा व दुषित पाण्याच्या दुर्गंधीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या धर्तीवर कोयनेश्वर मंदिर, कृष्णामाई व परिसरातील अन्य मंदिर समूह, कमळेश्वर मंदिर व लगतच्या मंदिरांचीही स्वच्छता करण्यात यावी, अशी अपेक्षा भाविक, नागरिकांमधून व्यक्त होत आहे.