राष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा

खा.श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत

राष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा
खा.श्रीनिवास पाटील
राष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा

कराड / प्रतिनिधी


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी राज्यपाल व साताऱ्याचे खा.श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी पत्राद्वारे या शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


राष्ट्रपती भवनाकडून कऱ्हाडच्या तहसिलदारांना शासकीय कार्यक्रमात पत्र व राजदंडक प्रदान करण्याचे आदेश आले होते. त्यानुसार कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकिय ध्वजवंदन कार्यक्रमात प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रपतींचे पत्र व राजदंडक प्रदान करण्यात आले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले की, राज्यपाल म्हणून तुम्ही सिक्कीम राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद भूषविले याची आठवण करून देताना मला आनंद होत आहे. आपण राज्यपालांचे संवैधानिक कर्तव्ये पदाच्या सन्मानानुसार पार पाडली. तसेच सिक्कीम राज्यातील लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्य दिले.

केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध दृढ करून आपली संघराज्य रचना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात आपले अमूल्य योगदान यशस्वीरित्या देऊन आपण आपल्या पदापासून मुक्त झालात. ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे.व्यक्तिमत्त्व, कृतज्ञता आणि विपुल अनुभवांनी समृद्ध असलेले तुम्ही नेहमीच समाज आणि देशासाठी प्रेरणेचे स्त्रोत राहाल.

तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छांसह भारतीय  प्रजासत्ताकचे सुसज्जित दंडक स्मृतिचिन्हाच्या रूपाने मी आपणास भेट देत आहे. राज्यपाल पदाच्या कार्याची आठवण ठेऊन गणतंत्र दिवशी केलेल्या या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करीत महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले आहेत.