एकाच दिवशी दोन शाळकरी मुलींचा मृत्यू

भोसे फाटा बनला अपघातग्रस्त स्पॉट

एकाच दिवशी दोन शाळकरी मुलींचा मृत्यू

पंढरपूर प्रतिनिधी / यशवंत कुंभार

पंढरपूर तालुक्यातील टेंभुर्णी रोडवरील भोसे फाटा अपघातग्रस्त बनला असून, या ठिकाणी नेहमीच अपघात होताना आढळतात. गुरुवार दि. २ मार्च रोजी झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलींना जीव गमवावा लागला. या चौकालगत रस्त्याला खेटून असणाऱ्या दुकानांमुळे, चौकात नेहमी गर्दी असते. यामुळेच या ठिकाणी कायम अपघात होत राहतात. बांधकाम विभागाचे मात्र याकडे कायमच दुर्लक्ष आहे.

 

 

भोसे येथील यशवंत विद्यालयात शिकणारी दिव्या देविदास जमदाडे हिचा गुरुवारी याच चौकात अपघात झाला. ११ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यावर ती दुचाकीवरून घराकडे जात होती. भोसे फाट्यावर आली असता, उभ्या असलेल्या पिकपचा दरवाजा अचानक उघडला गेला. दरवाज्यास थडकून ती  रस्त्यावर पडली. मात्र पाठीमागे काळ उभा होता. पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने तिला धडक दिली, पंढरपूरमध्ये लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेले असता , डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास भोसे फाट्यापासून काही अंतरावर दुसरी घटना घडली. पेहे येथील प्राथमिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी नेमतवाडी येथील

विद्यार्थिनी, राधा नागनाथ आवटे ही दहावीचा पेपर देऊन, दुचाकीवरून आपल्या बहिणीकडे निघाली होती. बार्डी पाटीजवळून जात असताना, अचानक एक झाडाचा फाटा गाडीवर कोसळला. या घटनेत ही विद्यार्थिनी गतप्राण झाली.

 

गुरुवारी एकाच दिवशी या दोन शाळकरी मुलींचा काळाने घात केला. या घटनांमुळे भोसे परिसर आणि नेमतवाडी परिसरात मोठी शोककळा पसरली. भोसे आणि पेहे येथील दोन्ही विद्यालयात या विद्यार्थिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

प्रशासन आणखी किती अपघात पाहणार

 

भोसे फाटा येथे अनेक दिवसांपासून मोठी वर्दळ वाढली आहे. येथील खाजगी जमीन मालकांनी, सरकारी जागेत दुकाने टाकण्यास परवानगी देऊन, त्यांच्याकडून भाडे वसूल करणे सुरू केले आहे. रस्त्यावरच दुकाने असल्यामुळे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या चौकात एखाद्या वाहनाची चूक झाली तर अपघातास निमंत्रण ठरते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिल्यास, आणि त्यांच्या हद्दीतील दुकाने उठवल्यास, रस्ता रुंद होण्यास मदत होईल, परिणामी अपघात होणार नाहीत.

 

 

चौकातच थाटली मावा गुटख्याची दुकाने

 

भोसे फाट्यावर चौकात आणि गुटखा विकणारी दुकाने खुलेआम सुरू आहेत. या दुकानांमुळे या चौकात नेहमीच गर्दी होते. टवाळखोर मुलांनी लावलेल्या गाड्या, रस्त्यावरच उभ्या असतात. रस्त्यावरच दुकाने आणि दुकानासमोर दुचाकी गाड्या अशी परिस्थिती असल्यामुळे, येथून जाणाऱ्या वाहनांची पंचाईत होते. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचीही या ठिकाणी कायम उठबस असते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.