कराडकरांना आता कोविड एक्सप्रेसची आवश्यकता

सध्या कराडमध्ये पाच कोविड सेंटर आहेत. पैकी चार कोविड हॉस्पिटल्स असून एक विलगीकरण सेंटर आहे. परंतु, शहरासह तालुक्यातील बाधितांची वाढती संख्या पाहता रुग्णांना याठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांनीच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यास अद्यापी मुहूर्त मिळाला नसून बेडअभावी रुग्णांसह नातेवाईकांचेही हाल होत आहेत. यावर कोविड एक्सप्रेस हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सध्य परिस्थितीत कराडकरांना कोविड एक्सप्रेसची नक्कीच आवश्यकता आहे.

कराडकरांना आता कोविड एक्सप्रेसची आवश्यकता

रुग्णसंख्येत वाढ : कोविड सेंटरमध्ये बेडचा अभाव, प्रशासनाच्या तत्परतेची गरज

राजेंद्र मोहिते/कराड : 

         सध्या कराडमध्ये पाच कोविड सेंटर आहेत. पैकी चार कोविड हॉस्पिटल्स असून एक विलगीकरण सेंटर आहे. परंतु, शहरासह तालुक्यातील बाधितांची वाढती संख्या पाहता रुग्णांना याठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांनीच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यास अद्यापी मुहूर्त मिळाला नसून बेडअभावी रुग्णांसह नातेवाईकांचेही हाल होत आहेत. यावर कोविड एक्सप्रेस हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सध्य परिस्थितीत कराडकरांना कोविड एक्सप्रेसची नक्कीच आवश्यकता आहे.
         राज्यात सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णांच्या उपचारासाठी बेडची कमतरता भासत होती. अशा परिस्थितीत रेल्वेने मदतीचा हात देत स्लीपर व वातानुकूलित डब्यांचे आयसोलेशन वार्डमध्ये रुपांतर करून कोविड एक्सप्रेस तयार केली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडे कोविड एक्सप्रेसचे सुमारे 60 डबे उपलब्ध असून त्यामध्ये 550 बेड आहेत. मात्र, या गाडीचे डबे पुणे, मिरज आदी. स्थानकांवर लावण्यात आले असून ते अजूनही मागणीच्या प्रतीक्षेत आहेत. रुग्णांअभावी जर कोविड एक्सप्रेसचे विविध सुविधांयुक्त डबे, बेड वापराविना पडून असतील तर कोरोनाचा हॉस्पॉट ठरत असलेल्या कराडसाठी प्रशासनाने कोविड एक्सप्रेसच्या काही डब्यांची मागणी केल्यास ही एक्सप्रेस कराडकरांसाठी नक्कीच नवसंजीवनी ठरेल.
         कोविड एक्सप्रेसमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे शक्य नाही. परंतु, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर मात्र या गाडीमधील बेडवर उपचार करणे शक्य होणार आहे. कोविड एक्सप्रेस कराड रेल्वे स्थानकांवर दाखल झाल्यास येथील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही होणारी गैरसोय दूर होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडे कोविड एक्सप्रेसच्या मागणीसंदर्भात पालिका, तालुका व जिल्हा प्रशासनानेही तत्परता दाखवण्याची गरज आहे.
         येथील कृष्णा, सह्याद्री, एरम व श्री हॉस्पिटल आणि पार्ले ही कराडमधील सध्या उपलब्ध असणारी कोविड सेंटर्स आहेत. पैकी पार्ले येथे प्रशासनाने सहवासीतांसाठी विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. तर कृष्णा, सह्याद्री, एरम व श्रीमध्ये कोरोना बाधितांवर थेट उपचार करण्यात येत आहेत. तसेच याठिकाणी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता असून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षही उभारण्यात आले आहेत.
         मात्र, कराडसह तालुक्यातील सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता कराडमधील उपलब्ध बेड अपुरे पडत असून रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत. आत्तापर्यंत शहरातील सात रुग्णांचा व्हेंटिलेटर बेडअभावी मृत्यू झाला असून येथील कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्याची मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार होत आहे. तरीही परिस्थिती जैसे थेच असून अजूनही बेडअभावी रुग्णांचे हाल होत आहे. शहरात पाच कोविड सेंटर्स असूनही व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडसह आयसोलेशन बेड मिळवण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरशः ससेहोलपट होत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.
           देशासह राज्यातही सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एस. टी. महामंडळाच्या बसेसना काही अटींवर प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. तर खाजगी वाहनांच्या प्रवासी वाहतुकीवर अद्यापही सरकारकडून निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. परंतु, केंद्र सरकारनेही अद्याप मोठ्या शहरांमधील लोकल रेल्वे व मालवाहतूक रेल्वेसेवा वगळता लांबपल्याच्या रेल्वे पूर्णतः बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे विविध ठिकाणची रेल्वे स्थानके रिकामी आहेत. 
           जर प्रशासनाने कराडसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडे कोविड एक्सप्रेसच्या काही डब्यांची मागणी केल्यास कराड रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवून येथील रुग्णांवर या एक्सप्रेसमध्ये उपचार करणे शक्य होणार आहे.

*कोविड एक्सप्रेसमधील उपलब्ध सुविधा : 

कोविड एक्सप्रेसमधील प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये चार रुग्णांची सोय, डब्याच्या दोन्ही बाजूला शौचालय व स्नानगृह, कमी वैद्यकीय मनुष्यबळात सेवा पुरवण्याची क्षमता, डॉक्टर्स व परिचारिकांना स्वतंत्र जागा, डासांपासून बचावासाठी बंदिस्त जाळीच्या खिडक्या, कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आदी. आदी. सुविधा रेल्वेकडून कोविड एक्सप्रेसमध्ये देण्यात आल्या आहेत. शिवाय, सध्या मालवाहतूक रेल्वे वगळता पुणे-मिरज मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा बंद असल्याने कराड रेल्वे स्थानकावर कोविड एक्सप्रेस थांबवून रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

*लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीही गरज : 

कराड शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगरपालिका, शहर व तालुका आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन प्रयत्नशील  आहेत. मात्र, येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसून रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मध्यंतरी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बेड वाढवण्यासाठी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीत कराडकरांसाठी कोविड एक्सप्रेस एकप्रकारे संजीवनी ठरणार असून ही गाडी कराड रेल्वे स्थानकावर आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीही गरज आहे.