कृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री

आत्ता होवू घातलेली निवडणूक तशी महत्त्वाची कारण सध्यस्थितीत डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते हे तिघेही आपआपल्या परीने प्रचाराची धुरा संभाळत आहेत.

कृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री

कृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री


कराड/प्रतिनिधीः-


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक प्रक्रिया अद्याप जाहिर झाली नसून. कृष्णेचे रणांगण मात्र तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे ही प्रचारात उतरले आहेत. तर त्यांना साथ द्यायला आजपर्यंत युवानेते डॉ.अतुल भोसले हे रणनिती निश्चीत करताना दिसत होते. कृष्णेच्या रणांगणात कृष्णेचे माजी चेअरमन मदनराव माहिते यांची भुमिका काय. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर मदनदादांची कृष्णेच्या रणांगणात एन्ट्री झाली. तीही विद्यमान चेअरमन सुरेश भोसले यांच्या व्यासपीठावर..! दादांची एन्ट्री चर्चेचा विषय बनली. त्याचा इतिहासही तसाच आहे. त्यांनी सभेत टिका करताना माजी चेअरमन अविनाश मोहितेंना लक्ष केले. अगामी काळात या रणांगणात काय काय होणार आहे हे यथा अवकाश समजेलच.


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक कायमच वादग्रस्थ ठरते. यापूर्वी संपूर्ण राज्याने सख्खे भाऊ..पक्के वैरी म्हणून या कारखान्याची चर्चा केली. माजी सहकार मंत्री असलेले थोर विचारवंत यशवंतराव मोहिते आणि त्यांचेच बंधू कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्यात 1989 ला संघर्ष झाला भाऊ-आप्पा हे एकमेकासमोर लढले. तब्बल तीस वर्षे चेअरमन असलेले जयवंतराव आप्पांची सत्ता उलथवून लावत भाऊंनी रयत पॅनेलची सत्ता आणली. कृष्णेचे चेअरमनपद आपले पुतणे मदनराव मोहिते यांना दिले. मदनदादांनीही भाऊंचा सल्ला घेत तब्बल दहा वर्ष चेअरमनपद भुषविले. चेअरमन कसा असावा, शेतकर्‍यांशी थेट संवाद, त्यांच्या अडचणी सोडवायच्या. चेअरमनच्या केबिनला दरवाजा बंद ही पद्धत नाही. येईल तो थेट दादांची भेट घेई. दादा त्यांचा प्रश्न जागेवर सोडवणार. अशी ख्याती म्हणून मदनदादा संपूर्ण कृष्णा कारखानाच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्ध झाले. दादांनीही आपल्यावर टाकलेल्या भाऊंच्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही. अशी त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. चार अंकी दर देण्याचा विक्रमही त्यांनीच केला. त्यामुळे मोहितेंची सत्ता असली की, सभासदांना दर मिळू शकतो याचा विश्वास बसला.


दादांच्या दहा वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा निवडणूक झाली आणि रयत पॅनेलला पराभूत करत आप्पांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनले सत्तेवर आले. अत्यंत शांत स्वभावाचे, कोणालाही उलटून बोलणार नाहीत, स्मित हस्य करत येणार्‍याच्या अडचणी जाणून घेणारे डॉ.सुरेश भोसले हे कारखान्याचे चेअरमन झाले. त्यांनीही आपली कारकीर्द चांगली चालविली. प्रत्येक सभासदाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रयत सहकार पॅनेलमध्ये निवडणूकीचा सामना झाला. आणि सहकार पॅनेलचा पराभव करून रयत पॅनेल सत्तेवर आले. भाऊंचे सुपुत्र सहकारातील डॉक्टर, तत्वनिष्ठ, परखड मतव्यक्त करणारे डॉ. इंद्रजीत मोहिते कारखान्याचे चेअरमन झाले. त्यांनी कारखान्याच्या प्रगतीमध्ये अनेक नवे संकल्प राबविले. आणि कारखाना उत्तमरित्या चालवला. त्यानंतर होवू घातलेल्या निवडणूकीला सामोरे जाताना मोहिते-भोसले घराण्यांनी मनोमिलनाचा प्रयोग केला. आपल्यातील संघर्ष नको म्हणत मोहिते-भोसले एक झाले. कृष्णाकाठी मनोमिलन झाले. हे मनोमिलन दोन घराण्यात झाले. मात्र सभासदांच्या पचणी पडले नाही.

 

या मनोमिलना नंतर निवडणूक जाहिर झाली आणि आबासाहेब मोहितेंचे सुपुत्र अविनाश मोहिते संस्थापक पॅनेल उभे केले. आणि चक्क कृष्णेच्या इतिहासात पहिल्यांदा मोहिते-भोसले यांना सोडून संस्थापक पॅनेल विजयी झाले. तदनंतरच्या निवडणूकीत तीन पॅनेल आमने-सामने उभी राहिली. यामध्ये सत्ताधारी असलेले अविनाश मोहिते यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या आणि सहकार पॅनले बहुमतात युऊन डॉ.सुरेश भोसले कारखान्याचे चेअरमन झाले. या निवडणूकीत मदनराव मोहिते व डॉ.इंद्रजीत मोहिते यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले.


आत्ता होवू घातलेली निवडणूक तशी महत्त्वाची कारण सध्यस्थितीत डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते हे तिघेही आपआपल्या परीने प्रचाराची धुरा संभाळत आहेत. कृष्णाकाठी तिरंगी सामना होणार अशी चर्चा सुरू आहे. सभासद चलबिचल आहेत. अनेकांचे मत आहे की, डॉ. इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते यांनी एकत्रित लढावे. हे घडेल की नाही माहित नाही. पण जर घडले तर, कृष्णाकाठी पुन्हा एकदा संघर्ष अटळ आहे. नाही घडले तरी निवडणूकीच्या रणांगणात तीन पॅनेल उभी राहणार आहेत. जी परिस्थिती गत निवडणूकीला झाली. तशीच परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. डॉ. इंद्रजीत मोहिते स्वतंत्र पॅनेल घेवून लढत असतील तर मदनदादा काय भूमीका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र मदनदादांनी भोसलेंच्या व्यासपीठावर एन्ट्री करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता कृष्णेच्या रणांगणात नवीन एक वळण निर्माण झाले आहे. पाहुया पुढे पुढे काय घडते ते...!