माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीच्या परिस्थितीचा घेतला आढावा

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीच्या परिस्थितीचा घेतला आढावा

पुसेसावळी येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीस भेट दिली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला.

 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारूक पटवेकर, पुसेसावळी गावचे सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, सोसायटी चेअरमन रवी कदम, तंटा मुक्ती अध्यक्ष अरविंद लवळे, माजी सरपंच सुरेश पाटील, मंडल अधिकारी, पोलीस पाटील सुरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदिसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीतील दंगलीत मृत झालेल्या नूरूल शिकलगार याच्या घरी भेट देऊन त्यांच्या आई वडील पत्नीची विचारपूस करून सांत्वन केले.

 

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गावातील ग्रामस्थांनी बाहेरील व्यक्तींच्या प्रभावात येऊन गावातील वातावरण बिघडवू देऊ नये तसेच सर्वांनी मिळून मिसळून रहावे. पुसेसावळी शांतताप्रिय गाव आहे, या गावाला क्रांतिवीरांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडले आहे. तसेच पुसेसावळीची बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठे पैकी एक आहे. त्यामुळे या गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे.