वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच - बंडातात्या कराडकर

हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज माझ्या भेटीला आले होते. वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच असून तो सर्वधर्म समवाचाही आहे. त्यामुळेच शिवप्रतिष्ठान या हिंदू संघटनेला वारकऱ्यांवरील अन्याय सहन झाला नाही. या भावनेतूनच भिडे गुरुजींनी आपली भेट घेतली

वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच - बंडातात्या कराडकर

वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच - बंडातात्या कराडकर 

करवडीत भेट : भिडे गुरुजींना वारकऱ्यांवरील अन्याय सहन झाला नाही, भेटीप्रसंगी शिदोरी म्हणून गुरुजींनी दिला संदेश

कराड/प्रतिनिधी :

      पायी वारीला विरोध करून पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत मला स्थानबद्ध केले. यामुळे अनेकांनी सहानभूती दर्शवत माझी भेट घेतली. त्यानुसारच हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज माझ्या भेटीला आले होते. वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच असून तो सर्वधर्म समवाचाही आहे. त्यामुळेच शिवप्रतिष्ठान या हिंदू संघटनेला वारकऱ्यांवरील अन्याय सहन झाला नाही. या भावनेतूनच भिडे गुरुजींनी आपली भेट घेतली असल्याचे मत वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले. 

       करवडी ता. कराड येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात बंडातात्या कराडकर यांची श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वारकरी  शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान पुंडलिक वरदा हरी विठ्ठल व छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जयच्या गजराने परिसर दणाणला.

      बंडातात्या कराडकर म्हणाले, प्रशासनाने देहूमध्ये राक्षसी पद्धतीने वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत मला स्थानबद्ध केले आहे. हा समस्त वारकऱ्यांवर झालेला अन्याय असून तो योग्य नसल्याची समाजभावना निर्माण झाली आहे. याच  भावनेतून संभाजी भिडे (गुरूजी) यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक असून यामागे अन्य कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

      ते म्हणाले, शासनाने पायी वारीला विरोध करून हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा व संस्कृती एकप्रकारे खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधाला न जुमानता आम्ही पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी आंदोलन करीत पंढरपूरच्या दिशेने पायी चाललो असताना पोलिसांनी मला स्थानबद्ध केले. पायी वारीच्या परंपरेत खंड पडू नये, म्हणून चाललेल्या आमच्या प्रयत्नांबद्धल श्री भिडे गुरूजींनी आमच्याप्रती अभिमान व्यक्त केला. तसेच या भेटीप्रसंगी गुरुजींनी आम्हाला शिदोरी म्हणून संदेश दिला असून त्यांनी व्यक्त केलेली सहानभूतीची भावना आम्ही स्वीकारली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

करवडीत भक्ती-शक्तीचा अनोखा संगम 

जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची भेट हा भक्ती-शक्तीचा संगम मानला जातो. याच भावनेने श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी दरवर्षी आषाढी वारीमध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तसेच पंढरपूरला निघालेला प्रत्येक वारकरी हा साक्षात पांडुरंगाचे रूप असून त्यांचे दर्शन घेण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे. यानुसारच पायी वारीची परंपरा जोपासण्यासाठी पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या बंडातात्या कराडकरांची संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी करवडी येथे भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतले. बंडातात्या हे वारकरी तर भिडे गुरुजी धारकरी आहेत. त्यामुळे या भेटीने उपस्थितांना आज अनोखा भक्ती-शक्तीचा संगम पहायला मिळाला.