युतीचे दिवास्वप्न 

युतीचे दिवास्वप्न 


लोकसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत कॉंग्रेसला पराभूत केले. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारमधील भाजप व शिवसेनेत उर्जेची लाट आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. विधानसभा निवडणुकीत आपणच बाजी मारायची या उद्देशाने भाजप व शिवसेनेने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर युतीची सत्ता आली तर भाजपाचा मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारला असता त्यांनीच पत्रकारांना प्रतिप्रश्न केला आहे की, भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं कोण म्हणतं? शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सूप्त वाद आहे, हे आता लपून राहिलेले नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर मुख्यमंत्री कोण, कोणात्या पक्षाचा हे ठरणार असे वाटते. किंवा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे भाजप व शिवसेना अडीच –अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष पाच वर्षांपूर्वी भाजप व शिवसेनेला डोईजड होते. परंतु देशात मोदी लाट आल्यापासून कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडले असून या पक्षांची दूरवस्था झाली आहे. आता भाजपमध्ये कोण लवकर जातो, याची स्पर्धा विरोधकांत लागली आहे की काय, असे वाटते. भाजपने सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरु केला आहे. राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. एकूण निवडणुकीचे नियोजन सुरु आहे. शिवसेनेनेही अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे. भाजपच्या वाट्याची हिंदू मते आपल्याकडे कशी वळतील, हा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. रावसाहेब दानवे यांनी युतीला २२० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सध्या तरी पत्रकारांना प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण केंद्रात दुसऱ्यांदा आघाडीचा दारुण पराभव झाल्याने विरोधकांची मानसिकता खचली आहे. नेमका याचाच राजकीय फायदा भाजप घेणार आहे.                                                                                                                                       येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांच्या बैठका आणि नेत्यांच्या दौऱ्यांना वेग आला आहे. शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी दौरा आयोजित करण्याची योजना आखली आहे. या दौऱ्याला जन आशीर्वाद दौरा असे नाव देण्यात येणार आहे.
या राज्यव्यापी दौऱ्यात लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले त्यांचे, तसेच ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचेही आभार मानण्यात येणार आहेत. युवा नेते आदित्य ठाकरे राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. जुलै महिन्यात शिवसेनेचा राज्यव्यापी दौरा  सुरू होणार आहे. जर शिवसेनेला भाजपाइतक्याच जागा लढवायला मिळाल्या, तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिवसेना विधानसभेच्या सर्व जागांवर पोहोचू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पोहोचण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने दौरा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी आहे अशा ठिकाणी ती वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसत आहे. ही झाली सत्ताधारी पक्षांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती. परंतु या निवडणुकीच्या तयारीसोबत कोण मुख्यमंत्री बनणार, यावर सेना- भाजपची खुलेआम चर्चा सुरु आहे. भाजपवाले सध्या जोशात आहेत. गेल्या ६ वर्षांत ते महाराष्ट्रातही शिवसेनेच्या पुढे गेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिरजोर होऊन सेनेपेक्षा जास्त जागांची मागणी करणार असे दिसते. शिवसेनेला ते मान्य असेल तर युतीचा प्रस्ताव स्वीकारला जाईल, अन्यथा वेगळी वाट चोखाळण्याचे मार्ग शिवसेनेपुढे उपलब्ध आहेत.                    आगामी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा जिंकणार असा विश्वास भाजप- शिवस्नेला आहे. त्यावरून मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु आहे. राजकीय समीक्षकांचे मत आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर ज्यांचे संख्याबळ जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित असले तरी पारंपरिक राजकारणाला फाटा देऊन भाजप- सेनेला अडीच –अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेनेने त्यासाठी अपेक्षित जागा मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या नाहीत तर भाजपचा मुख्यमंत्री पाच वर्ष राहण्याची शक्यता आहे.                                                                                                                                भाजप पक्षातील मुख्यमंत्र्यांची निवड अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ठरवतील. परंतु देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी गेल्या पाच वर्षांत समाधानकारक झाले आहे. तसेच मराठा आरक्षणप्रश्नी त्यांनी सकारात्मक कामगिरी केली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या निर्णयावर राज्यातील मराठा समाज खुश आहे. फडणवीस यांच्या प्रतिमेचा भाजपला महाराष्ट्रात राजकीय फायदा होणार आहे. त्यामुळे फडणवीस दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायचे म्हटले तर प्रथम विचार होणार आहे तो युवा नेते आदित्य ठाकरे यांचा. कारण काही दिवसांपूर्वी शिवसनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी म्हटले होते की, युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. शिवसेना त्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सेनेतून विरोध होणार नाही, हे निश्चित. ही झाली मुख्यमंत्रीपदाची चर्चा परंतु आगामी विधानसभेची निवडणूक दोन- तीन महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत युतीतील पक्ष बाजी मारणार की आघाडीचे हे अजून निश्चित झालेले नाही. राजकारणात केव्हाही सत्तापालट होऊ शकतो. त्यामुळे कोणाची सत्ता येणार, कोण मुख्यमंत्री होणार, अशी स्वप्ने रंगविणे म्हणजे दिवास्वप्न ठरेल.