'घोडी' गेली 'वजीर' शाबूत....!

रात्रीच्या अंधारात वाळू उपशाचे गौडबंगाल

'घोडी' गेली 'वजीर' शाबूत....!

कराड/प्रतिनिधी

 

कराड तालुक्यातील 'त्या' विभागातील बुद्धिबळाच्या सारीपाटावरील अंतर्गत वादात दोन घोडी गळाला लागली आहेत.तर 'वजीर' शाबूत असून, नवीन 'प्यादी' घेऊन डाव खेळायची तयारी सुरू असल्याची चर्चा 'खात्या'त आहे.कराड मधील 'त्या' विभागात पैशाचा पाऊस नेहमीच पडत असतो.शनिवार,रविवार आला की चंगळवार आल्यासारखी परिस्थिती असते, येणारे धन कुठे ठेऊ आणि कुठे नको अशी अवस्था प्रत्येक आठवड्यात होत असल्याने,किमती नजराणे खरेदी व भेट देण्याकडे कल वाढला आहे.घोडी गेली पण कर्ता करवीत्याच काय?याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तर रात्रीच्या अंधारात वाळू उपशाचे गौडबंगाल वाढतच चाललं आहे.

 

कृष्णा नदीकाठच्या एका गावातील मंदिर बांधण्यासाठी वाळू उपसा करण्यासाठी दिलेली परवानगी 'वजीर' यांच्या अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाल्याची चर्चा आहे.बेफाम वाळू उपसा झाल्याची मोठी चर्चा परीसरात असून 'नाक्या' जवळील एका पोलीस ठाण्यातील पोलिसही त्यावेळी घटनास्थळी जाऊन आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याची कल्पना निश्चितच 'त्यां'ना असणार आहे कारण त्या गावातील ग्रामस्थ छातीठोकपणे आरोप करीत आहेत की अगणित वाळू उपसा झाला आहे.आणि याला तोंडी परवानगी वजीरांनीच दिली आहे.

 

अवैध वाळू उपशाच्या ससेमिऱ्यातून आपली सुटका करण्यासाठी पद्धतशीर लावलेल्या जाळ्यात आपल्याच घोड्याला अडकवले असल्याची चर्चा खात्यात आहे.आपल्या गळ्यातील दोरी दुसऱ्याच्या गळ्यात अडकवून 'ते' रिकामे झाले असले तरी, जाणारे गेले परंतु येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सोबतीला कोणीही नसल्याने वाट बिकट आहे.'जरा जपून'असा सल्ला देण्यात काही वरिष्ठ मंडळी आपला वेळ खर्च करीत आहेत. परंतु खात्यातील काही अतृप्त इच्छाधारी व्यक्तींच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या आहेत.'रावसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशी साद देण्यात कुठेही कमी पडत नाहीत.

 

एवढा मोठा संशयकल्लोळ झाला तरी अवैध वाळू उपसा शांत होण्याचे नाव घेत नसून,वजीरांनीच नवीन टीम तयार करण्याची मोहीम उघडल्याची चर्चा 'त्या' कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्यात आहे.सावधान जरा बेताण घ्या असा उपरोधिक सल्ला देण्यात सुद्धा कमी पडत नसून,अमाप वरकमाईच्या लोभाने अनेक नवीन हस्तक अवैध वाळू उपशाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी सरसावले असल्याची खसखस पिकली आहे.जुने जाणते कर्मचारी भानगडी पासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु निर्ढावलेली वाळू चोरांची साखळी वरूनच मामला फिट करत असल्याने गाव पातळीवर काम करणाऱ्या 'त्या'विभागातील कर्मचाऱ्यांची बोलती बंद होत आहे. 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती झाल्याची चर्चा 'त्या' विभागातील कर्मचारी करीत आहेत.अवैध वाळू चोर धरला तरी वरून हुकूम आला की गपगुमान कारवाई बासनात गुंडाळून ठेवावी लागत असल्याची चर्चा आहे.यामुळे जिल्हाधिकारी यांनी 'मलमपट्टी' न करता 'रामबाण' इलाज करण्यावर भर द्यावा अशी चर्चा जोर धरू लागली असून "खटक्यावर बोट जाग्यावर पलटी" करण्यात जिल्हाधिकारी तरबेज असल्याबाबत नागरिकांना विश्वास आहे.