गांधींप्रमाणे सत्तेचा अतिरेक मोदींना पहावा लागेल - बाबा आढाव

गांधींप्रमाणे सत्तेचा अतिरेक मोदींना पहावा लागेल - बाबा आढाव

 

 कराड/प्रतिनिधी :
                        देशातील लोकशाही व संविधान सध्या धोक्यात आलेले आहे. त्यामुळे आजचे सरकार आणि आत्ताचे सरकार पाहता सत्ताधार्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. मी स्वातंत्र्याचा साक्षीदार असून इतिहासाला कलाटणी देण्यासाठी तेवढा पुरशार्थ लागतो ही वस्तुस्थिती आहे. मात्र, देशाच्या परिवर्तनाचे चक्र उलट्या दिशेने फिरवले आहे. सरकारकडून एक प्रकारे लिखित स्वरूपात दहशत पसरवली जात असून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते. एके काळी सत्तेच्या अतिरेकामुळे इंदिरा गांधींना त्याचा फटका बसला होता. देशातील सध्याची परिस्थितीही भयंकर आहे. सत्तेच्या जोरावर अनेक बाबतीत अतिरेकी निर्णय होताना दिसत असल्याने नरेंद्र मोदींनाही निश्चितच सत्तेचा अतिरेक पाहावा लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.
              कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा अमृत महोत्सवी शेतकरी मेळावा व स्वा.सै. शामराव पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्याच्या अनावर कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँगेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,  माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आ. संग्रामसिंह थोपटे, जिल्हा परिषद सदस्य व रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, प.स. सभापती फरीदा इनामदार, उपसभापती सुहास बोराडे, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, उपसभापती विजयकुमार कदम, सचिव बाबासो निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी समितीचे सर्व संचालक, सेवकवर्ग यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.