उद्धवराज

महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे आपले राजकारण (की हुकूमशाही ?) बिनदिक्कत चालेल, या भरवश्यावर असलेल्या भाजपला महा विकास आघाडीने चांगलाच धडा शिकवला असून महाराष्ट्रात या आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असून राज्यात उद्धवराज सुरु झाले आहे.

उद्धवराज
नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संपादकीय / अग्रलेख 

          महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे आपले राजकारण (की हुकूमशाही ?) बिनदिक्कत चालेल, या भरवश्यावर असलेल्या भाजपला महा विकास आघाडीने चांगलाच धडा शिकवला असून महाराष्ट्रात या आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असून राज्यात उद्धवराज सुरु झाले आहे. महा विकास आघाडीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष सामील आहेत, यामुळे ते सरकार कसे चालवणार,अशी शंका भाजपकडून वारंवार व्यक्त केली जात आहे. परंतु या शंकेत आता काहीच दम उरलेला दिसत नाही. कारण महाविकास आघाडीने प्रत्येक निर्णय तावून सुलाखून घेतलेला दिसत आहे. राज्यात भाजपने केलेली सत्तेसाठी बळजोरी आणि पवार यांनी नंतर केलेल्या पवार गेम जनतेच्या लक्षात आहे. विरोधकांना हा गेम धडकी बसवणारा वाटला असावा. कारण एक मोठा सर्जिकल स्ट्राईक शरद पवारांनी महाराष्ट्रात घडवून आणला आणि भाजपला स्वगृही बसवले. मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन असे तीन वेळा निक्षून सांगणाऱ्या फडणविसांना आता खरे राजकारण काय असते, हे समजले असेलच ! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच म्हणाले, आमचा अजित पवारांवर विश्वास होता. अमित शाह हे केव्हापासून विरोधी पक्षांवर विश्वास ठेवायला लागले, असा प्रश्न मनात येतो. आत्तापर्यंत शाह यांनी किती जणांचा विश्वास सत्तेसाठी धुळीला मिळवला, याचा त्यांनी कधी विचार केला आहे का ? शाह यांना महाराष्ट्राने गनिमी कावा दाखवला म्हणून त्यांच्याकडे उत्तर नसल्याने ते असे म्हणत असावेत, हेच खरे. काहीही असो, विरोधकांना बगल देत महाराष्ट्राने स्वाभिमान दाखवत महाविकास आघाडी केली आणि राज्यात सत्ता स्थापना झाली, हेच महत्वाचे आहे.                                                    महाराष्ट्रात कुणीही यावे आणि टिकली लावून जावे, असा प्रकार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, हे राज्यातील नेत्यांनी दाखवून दिले. काल परवा महाराष्ट्रात शिवसेनेचे बोट हातात धरून चालणाऱ्या  भाजपने २०१४ साली मोदी लाटेत राज्यात बहुमत मिळवले होते. त्यामुळे भाजपचा आशावाद (की अति आत्मविश्वास ?) वाढीस लागला होता. भाजपचा प्रत्येक नेता स्वतःला नरेंद्र मोदी आणि अमित शाह समजत होता. नेत्यांमध्ये अहंकार भरला की, नेत्याला समोरचे काही दिसत नाही आणि आपण ज्याचे बोट धरून सत्ताकारण शिकलो त्याचे भान उरत नाही. तसेच भाजपचे झाले. २०१४ साली भाजपला बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला विचारात घेतले नव्हते. कारण काय तर आता आम्हाला बहुमत मिळाले, शिवसेनेची गरज काय ? परंतु शिवसेनेने भाजपचा जाणीवपूर्वक छोटा भाऊ होत पाच वर्षे सहन केली. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला भाजप- सेनेने युती करत काही जागा जिंकल्या. भाजपने केंद्रात शिवसेनेला फक्त एक जागा मंत्रीपदाची दिली. कामी महात्वाही खाती देऊन भाजपने अपमान केला होता, हे सर्व महाराष्ट्राला माहित नव्हते असे नाही. परंतु वेळ आल्याशिवाय बोलायचे नाही आणि अंगावर आल्याशिवाय दुसऱ्याला धडा शिकवायचा नाही, ही महाराष्ट्राची सहिष्णू वृत्ती आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपशी विधानसभा निवडणुकीत युती केली. परंतु भाजपचे मनसुबे वेगळेच होते. महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष शिवसेनेचे महत्व कमी करत आपलाच झेंडा फडकत ठेवायचा, ही रणनीती महाराष्ट्रातील इतर पक्षांतील नेत्यांच्या लक्षात आली होती.                                                                                                                      देवेंद्र फडणविसांना नेहमीप्रमाणे अपेक्षा होती की, आपल्या पक्षाचे  दिल्लीतील चाणक्य आमदारांच्या फोडाफोडीत हुशार आहेत, महाराष्ट्रात सर्व काही अपेक्षेप्रमाणे होणारच ! त्याप्रमाणे भाजपने १०५ जागा असताना आणि इतर कुठल्या पक्षांचा पाठिंबा नसतानाही कुठल्या पक्षांतील आमदार फोडता येतील का याची चाचपणी केली. परंतु सत्तेचे काही जमत नाही म्हटल्यानंतर फडनैसानी मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम दिला. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी फक्त २४ तासांची मुदत दिली. या अल्पावधीत सरकार कसे बनणार ? त्यामुळे भाजपवाले निश्चित होते. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या मुदतीच्या आत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे पातक केंद्रातील मोदी सरकारने केले, हे सर्वश्रुत आहेच ! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून महाराष्ट्राला सहा महिने खेळणे बनवण्याचा भाजपचा रिकामटेकडा उद्योग शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या लक्षात आला. तिघांनी एकत्र येत न्यायालयीन लढा दिला. पवारांनी भाजपशी गनिमी कावा करत भाजपला कायमची अद्दल घडवली. काल गुरुवारी सांयकाळी दादर येथील शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी मोठ्या दिमाखात साजरा झाला. महाराष्ट्राचा ऊर मोठ्या अभिमानाने भरून आला. स्थानिक पक्षांना संपवणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे राजकीत कट कारस्थान केले, पण त्यांचा निभाव लागला नाही. महाराष्ट्र ही शूर, संत आणि समाजसुधारकांची भूमी आहे. जे महाराष्ट्राला विघातक हेतूने आडवे येतील, त्यांचा सफाया कसा करायचा हे महाराष्ट्र जाणतोच. या भूमीत फोडाफोडीचे राजकारण, इतरांना वेठीस धरण्याचे प्रकार यापुढे होऊ नयेत, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने पुढाकार घेऊन सत्ता स्थापना केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे. महाराष्ट्रात उद्धवराज सुरु झाले असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे बाळकडू घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्रात विकासकारण आणि राजकारण भवितव्यात करतील, अशी अपेक्षा आहेच.