मोफतची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महागली

उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार

मोफतची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महागली

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असणारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पैसे घेऊन केली जात असल्याने गोरगरीब कुटुंब हवालदिल झाले आहेत तर शासनाच्या रुग्णालयात पैसेच द्यायचे असतील तर खाजगी रुग्णालय काय वाईट आहेत अशीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.नागरिकांना बूस्टर डोस मिळत नाही,उद्धट उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी कायमच होत असतात परंतु मोफत सेवेचे पैसे घेणे म्हणजे अतिशय संतापजनक प्रकार घडला असल्याने संबंधित डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

याबाबत एका प्रत्यक्षदर्शी आणि पीडित व्यक्तीने दै.प्रीतिसंगम जवळ आपली व्यथा सांगताना अक्षरशः डोळ्यांतून पाणी काढले होते.एक सीझर असेल तर १ हजार रुपये आणि २ सीझर असतील तर २ हजार रुपये असा दर उंब्रजच्या शासकीय दवाखान्यात आकारण्यात आला असून मी एक सामान्य नागरिक असून पैसे घेतल्याशिवाय माझ्या पेशंटला ऑपरेशन रूममध्ये प्रवेश दिला नाही यामुळे उसनवारी करून पैसे भागवले आहेत.आम्ही हातावरील पोट असणारी माणसे पैसे कसे द्यायचे ही विवंचना कायमच सतावत असते.परंतु मोफत असणारी सुविधेसाठी पैसे का आकारले याबाबतचा उलगडा अजूनही आम्हाला होत नसल्याबाबत संबधित तक्रारदाराने सांगितले आहे.

उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरीब रुग्णांचे पैसे घेतले जातात बुधवार दि.८ रोजी सुमारे ३५ कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या असून प्रत्येकी १ ते २ हजार प्रमाणे सुमारे कितीतरी हजार रुपये विनाकारण लाटले असल्याने महिन्यातील वरकामाई किती मोठी असणार याबाबत अंदाज केला असता संबंधित प्रकरणाशी दोशी आढणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर व्हावी अशी मागणी गोरगरीब नागरिकांच्यातून होऊ लागली आहे.

कारवाई होणार

संबधित घटनेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार यांचेशी संपर्क साधला असता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही परंतु उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात पैसे घेतले असतील हा अतिशय गंभीर प्रकार असून याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल

राधाकृष्ण पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी