कराडच्या मतदारांना केंद्रबिंदू मानूनच निर्णय - आ. पृथ्वीराज चव्हाण

कराडच्या मतदारांना केंद्रबिंदू मानूनच निर्णय - आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : 

                        कराडच्या मतदारांचा आदर राखून आगामी राजकीय भूमिका येत्या दोन दिवसांत जाहीर करणार, सध्या देशात ऐतिहासिक लढाई सुरु आहे. पक्ष, देश संकटात आहे. सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग केला जात आहे. भाजपकडून साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरली जात असून ईडी, सीबीआयचा दुरुपयोग केला जात आहे, अशा परिस्थितीत लोकशाही बळकट रहावी याकरता सर्वांनी कॉंग्रेसच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करतानाच पक्षनेतृत्वाला माझी भूमिका सांगितली आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करूनच आपण आपला निर्णय घेऊ अशी, भूमिका त्यांनी मांडली.

                        कराड दक्षिण कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी 29 रोजी दुपारी आयोजित बूथ कमिटी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळूक, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, माजी जि. प. सदस्य जयवंत जगताप, निवास थोरात, शंकरराव खबाले, विद्या थोरवडे, अजित पाटील चिखलीकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पं.स. सदस्य नामदेवराव पाटील, नगरसेवक इंद्रजीत गुजर, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, झाकीर पठाण, नरेंद्र पाटील, नाना पाटील, नितीन थोरात  यांच्यासह दक्षिणमधील अनेक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

                     या मेळाव्यात कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बाबा, आपण दक्षिणेतूनच लढा, अशी जोरदार मागणी केली. कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभेची निवडणूक लढवू नये आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ सोडू नये, अशी मागणीच सर्व पदाधिकार्यांनी केली. 

                 आ. चव्हाण म्हणाले, जनतेने माझ्यावर 1991 पासून प्रेम केले आहे. त्यामुळे इथेपर्यंत आलो आहे. कुठेही जाणार नाही. पक्ष नेतृत्वाला माझी भूमिका सांगितली आहे. कराडला आज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे, अशी भुमिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली.

                   ते पुढे म्हणाले, ऐतिहासिक लढाई आहे. पक्ष, देश संकटात आहे. सत्तेचा आणि पैशाचा एवढा दुरूपयोग आपण आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे या सरकारला हाकलण्याची आवश्यकता असून या क्रांतीची सुरूवात कराडपासून व्हावी. भाजपाकडून साम, दाम, दंड, भेद ही निती वापरली जात असल्याचे सांगत खासदार शरद पवार यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून भाजपावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. 

                    तसेच 11 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेंत 25 हजार कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो ? असा प्रश्नी उपस्थित करत 25 हजार कोटींच्या भ्रष्टाचारांचे पुरावे जनतेला दाखवा. 2008 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अधिकार्यां च्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला होता. 2014 साली त्या निर्णयात चुकीचे झाल्याची कुजबूज सुरू झाली आणि 2016 याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. यात चिदंबरम यांचे नाव नव्हते, असा दावा करत 2019 साली निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरूंगात सतरंजीवर झोपायला भाग पाडले जाते. डाळ नसलेली आमटी खायला दिली जाते. चपात्याही खाण्या योग्य नसतात. त्यांना जामिनही मिळू दिला जात नाही. ते काय देश सोडून पळून जाणार आहेत का, ते काय खुनी आहेत का ? असे प्रश्नद उपस्थित करत त्यांनी भाजपावर टीका केली. 

                    त्याचबरोबर तसेच कर्नाटकचे डी. के. शिवकुमार यांच्यासह अन्य नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. कऱ्हाडात अविनाश मोहिते यांनाही तीन महिने तुरूंगात काढावे लागले. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळुक म्हणाले, विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुका सातारा जिल्ह्यासाठी आणि दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्याकडे बारकाईने पाहून निर्णय घ्यावा. पृथ्वीराज बाबा विधानसभा लढणार हे कोणी सांगायची गरज नाही. त्यामुळे त्याबाबत तुम्ही निश्चित रहा. विदर्भातील मुख्यमंत्री असूनही विदर्भात एकही काम झाले नाही. मात्र बाबा पश्चिम महाराष्ट्रातील असूनही मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भात विकास उभा केला. मात्र, सध्या भाजपचे हवा तयार करायची आणि केवळ जाहीरातीवर उड्या मारायचे काम सुरू आहे. लोकांच्या मनाने चालणारा नेता अशी, पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे साम दाम दंड भेद या कोणत्याही गोष्टीला काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते बळी पडणार नाहीत. ईडीची नोटीस काढून लोकांना आपल्याकडे खेचू पाहणाऱ्या भाजपला योग्य जादा दाखवा. यावेळी बहुतांशी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक न लढवता त्यांनी विधानसभा लढवावी, अशा स्वरुपाच्या भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी कराड दक्षिणमधूनच पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी असावी, अशा प्रखर भावना मांडल्या. 

ईडी व सीबीआयचा दुरुपयोग 

ईडीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना, पोलिसांनी शिखर बँकेमध्ये ११ हजार कोटींच्या ठेवी असल्याचे न्यायालयात सांगितले आहे, त्यामुळे २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो, असे विचारत भाजप व मुख्यमंत्री इडी, सीबीआयच्या माध्यमातून अनेकांच्यावर दबाव टाकत आहे, असा आरोप आ. चव्हाण यांनी केला. उद्या माझीही इडीमार्फत चौकशी करू शकतात, तशी मानसिकता मी ठेवली आहे. माझ्यासोबत औषधे व पुस्तके ठेवायला सांगितली आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावत भीती व्यक्त केली. 

लोकसभा की विधानसभा ? निर्णय गुलदस्त्यात 

पृथ्वीराज बाबा लोकसभेची निवडणूक लढणार की विधानसभेची, ही उत्सुकता सर्वांना होती. त्यांनी पक्षश्रेष्ठीना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन आपला निर्णय कळवू असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या या मेळाव्याला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्तेही आक्रमक होते. कोणत्याही परीस्थितीत बाबांनी दक्षिणेमधुनच निवडणूक लढवावी, अशी सर्वच वक्त्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली. मात्र, बाबांनी कराडचा मतदारांचा आदर ठेवून दोन दिवसांत निर्णय घेऊ असे सांगितल्याने ते कोणती निवडणूक लढवणार, हे गुलदस्त्यातच राहिले.