जिल्हाबंदी कायम राहणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच ग्रीन झोन व ऑरेंज झोनमधील उद्योगांना परवानगी-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

जिल्हाबंदी कायम राहणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :

 राज्यातील जनता अदृश्य शत्रूशी लढत आहे. आतापर्यंत जनतेने खूप संयम ठेवला आहे. 20 एप्रिलला महाराष्ट्रातील बंदला 6 आठवडे पूर्ण होत आहेत. दि. 18 एप्रिलपर्यंत 66796 तपासण्या झालेल्या आहेत. यात 95 टक्के व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात 3600 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. 350 च्या जवळपास रूग्णांना बरे करून घरी सोडले आहे. राज्यात रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन अशी तीन झोन केलेले आहेत. ग्रीन झोन व ऑरेंज झोनमध्ये सशर्त उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, रूग्णांनी कोणत्याही आजाराची लक्षणे लपवू नयेत. घरच्या घरी औषधे घेवून उपचार करण्याचा प्रयत्न न करता ताबडतोब रूग्णालयात यावे. तपासणी करून घ्यावीत. घरात लपून न बसता थोडीही जरी लक्षणे आढळली तर रूग्णालयात यावे. कोरोना या आजारावर अद्यापपर्यंत कुठलेली औषध सापडलेले नसून याच्यापासून लांब राहणे हाच यावर उपाय आहे.
राज्यातील उद्योग व व्यवसायांना मुभा देण्यात येत असली तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर घराबाहेर पडू नये. जिल्हाबंदी कायम असून, जिल्हांतर्गत वाहतूकीला परवानगी देण्यात येत आहे. सर्वच जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. वर्तमानपत्रांच्या घरोघरी वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी राज्यातील जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. वृत्तपत्रांचे स्टॉल लावून विक्री करण्याला कुठलीही बंदी नसल्याचे त्यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले.राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी टाळेंबंदीला सर्वांनी सहकार्य करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावं, घरातूनच काम करा, घरातच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचे पालन करा, शासनाने वेळोवळी दिलेल्या सूचनांचे, नियमांचे पालन करा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.