उंब्रज येथे महामार्गावर पारदर्शक उड्डाणपूल व्हावा :- आ.बाळासाहेब पाटील

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे आग्रही मागणी,ग्रामपंचायत उंब्रज व ग्रामस्थ उंब्रज यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीवरून पाठपुरावा सुरू.

उंब्रज येथे महामार्गावर पारदर्शक उड्डाणपूल व्हावा :-  आ.बाळासाहेब पाटील

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लगत उंब्रज तालुका-कराड, जिल्हा-सातारा हे ४५ हजार लोकसंख्येचे तसेच अंदाजे ७० ते ८० खेडोपाड्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाणाचे गाव आहे. याठिकाणाहून चिपळूण-पंढरपूर राज्यमार्ग १४३ हा छेदून जातो, तसेच कोकण परिसरातून चिपळूण-मल्हारपेठ उंब्रज मार्गे शामगाव-मायणी- पंढरपूर कडे जाणे-येणेसाठी प्रचंड दळणवळण याठिकाणाहून नेहमी सुरु असते.

सद्या या महामार्गावर भराव पूल झालेला असून पूर्व व पश्चिम भागातील सेवा रस्त्यावर पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफीस, टेलीफोन ऑफीस, एम.एस.इ.बी. ऑफीस, नगर भूमापन ऑफीस, कृषि ऑफीस, धोम पाटबंधारे ऑफीस, राष्ट्रीयकृत ५ बँका, २५ ते ३० पतसंस्था, ३ महाविद्यालये, ७ विद्यालये, अनेक हॉस्पिटल, बस स्टॉप तसेच उंब्रज जवळ औद्यागिक वसाहत असल्याने व्यवसाय व उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे गावाची लोकसंख्या व विस्तार वाढ मोठया प्रमाणावर होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत- असल्याने पावसाळ्यात महामार्गाखालील दळणवळणासाठी असणाऱ्या बोगद्यामध्ये पाणी साठत असते. त्यामुळे लोकांच्या सोईसाठी राष्ट्रीय महामार्गावर पारदर्शक पूल (फ्लाय ओव्हर) होणे गरजेचे आहे.

सेवा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास त्याचप्रमाणे वाहनधारकांचे इंधनामध्ये आणि वेळेमध्ये बचत होण्यास तसेच दळणवळणाच्या दृष्टीने सोईचे होण्यासाठी उंब्रज, तालुका-कराड येथे पारदर्शक पूल (फ्लाय ओव्हर) होणेसाठी आपणाकडून विचार होवून सर्वेक्षणाचे आदेश होणेबाबत आग्रही मागणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे केली.