चोरीच्या संशयावरून कराडतील चौघांना हैद्राबाद पोलिसांनी ताब्यात घेतले

चोरीच्या संशयावरून कराडतील चौघांना हैद्राबाद पोलिसांनी ताब्यात घेतले

 

व्यापाऱ्याच्या लुटीचा संशय; हैद्राबाद पोलिसांचे  
संशयितांच्या घरांवर छापे

कराड/प्रतिनिधी : 
                 एका व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी कराड येथील चौघांना हैदराबाद पोलिसांनी शनिवार दि. 20 रोजी ताब्यात घेतले आहे. साध्या वेशातील पोलिसांनी कराड येथील संशयितांच्या घरांवर छापे टाकलेे. दरम्यान, याप्रकरणी कराड पोलिसांना काही कल्पना नसली तरी त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
                 याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, हैद्राबाद येथील एका व्यापाऱ्याने सुमारे  महिनाभरापूर्वी मुंबई येथे सोन्याचा व्यवहार केला होता. त्यामध्ये हैद्राबाद येथील एका व्यापाऱ्याला मोठी रक्कम मिळाली होती. ही रक्कम घेऊन तो व्यापारी हैद्राबादला जाणार होता. 
         दरम्यान, सोबत काही कोटींची रोख रक्कम असल्याने त्याने मुंबई येथून भाड्याने वाहन केले होते. मुंबई येथील व्यवहार संपवून मिळालेली रक्कम घेऊन तो हैद्राबादला निघाला होता. 
         प्रवासादरम्यान संबंधित वाहनचालकाला व्यापार्‍याकडे रोख रक्कम असल्याची शंका आली. त्यामुळे त्याने संबंधित व्यापाऱ्याला लुटण्याचा डाव करून कराडमधील आपल्या मित्रांना संपर्क केला. व त्यांना पुणे येथे येण्यास सांगितल्याची चर्चा आहे. 
             तत्पूर्वी, पुणे येथे आल्यावर कराडातील मित्रांच्या मदतीने वाहनचालकाने डाव रचून पुणे परिसरातच व्यापाऱ्याला लुटल्याची चर्चा आहे. कराडमधून संशयित तीन ते चार युवकांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करून व्यापाऱ्यांसह चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून पळवून लावले. त्यानंतर संबंधित वाहनचालकही पसार झाल्याने व्यापाऱ्याला चालकाचा संशय आला. त्यामुळे व्यापाऱ्याने हैद्राबाद पोलिसात धाव घेतली.                                                                                       पोलिसांनी व्यापाऱ्याने दिलेल्या फोन नंबरवरून चालकाचे लोकेशन तपासले. यावरून तो गेली महिनाभरापासून बेंगलोर व अन्य शहर फिरत असल्याचे व काही दिवसांपासून कराडमध्ये असल्याचा संशय आला. त्यावरून पोलिसांनी चालकाला उचलून त्याच्याकडे चौकशी करून शनिवारी सकाळी त्याच्या इतर साथीदारांना हैद्राबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे कराड शहरात खळबळ उडाली आहे.