बेलवडेत सोशल डिस्टन्सिंगने पोलिसांवर पुष्पवृष्टी

बेलवडेत सोशल डिस्टन्सिंगने पोलिसांवर पुष्पवृष्टी

कराड/प्रतिनिधी : 
          कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील गावोगावी जनजागृती रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीदरम्यान बेलवडे बुद्रुक येथे ग्रामस्थांसह युवकांनी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर सोशल डिस्टन्सिंग राखत पुष्पवृष्टी केली. 
          सातारा जिल्हा पोलीस, कराड तालुका पोलीस ठाणे व आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी 19 रोजी काले, कालवडे, बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, मालखेड, वाठार, आटके, नारायणवाडी गावात पोलिसांसह आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सेविकांनी जनजागृती रॅली काढली. या रॅलीत पोलीस व आरोग्य विभागाच्या गाडीसह दुचाकीवरून पोलीस व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. 
         या रॅलीदरम्यान बेलवडे बुद्रुक येथे दुपारी 2 वाजता या जनजागृती रॅलीचे आगमन झाले. यावेळी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ व युवकांनी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. याप्रसंगी ग्रामस्थ, युवकांनी सोशल डिस्टन्स राखत मास्कचाही वापर केला. पोलिसांनीही त्यांच्या या स्वागताला मनःपूर्वक दाद दिली. 
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे पोलीस प्रशासनावर ताण वाढला आहे. कोणताही सण, समारंभ, उत्सव, आपत्ती असो वा सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या काळातही पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या कार्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी गावोगावी लोकांमधून पोलिसांवर पुष्पवृष्टी करण्यात येत असल्याचे दिसून येते.