जखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...!

जिल्हाधिकारी साहेब,सिव्हील सर्जन यांच्या कारभाराकडे जरा लक्ष द्या 

जखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...!

जखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...!

जिल्हाधिकारी साहेब,सिव्हील सर्जन यांच्या कारभाराकडे जरा लक्ष द्या 

फलटण / अनमोल जगताप:

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सातारा जिल्ह्यात हाहाकार उडालेला आहे. गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत तब्बल 2962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतू, कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी औषधांसह इतर साधनांचा तुटवडा असल्यामुळे बाधितांवर नक्की उपचार तरी कसा करायचा? असा प्रश्‍न वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांवर पडला असतानाच कोरोनावर रामबाण ठरलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या कृत्रिम तुटवड्यामुळे मात्र देशात आणि पर्यायाने जिल्ह्यात काळाबाजार होत असल्याने डॉक्टरांनाही आपल्या उपचारपद्धतीमध्ये बदल करावा लागला. परिणामी अनेक कोरोनाबाधितांना आपला हाकनाक जीव गमवावा लागला आहे.


गेल्या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. जागतिक आरोग्य संघटना तसेच आयसीएमआर ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांनी उपलब्ध साधने तसेच औषधांच्या आधारावर बाधितांवर औषधोपचार सुरु केले. पहिली लाट ओसरते न् ओसरते तोच या वर्षाच्या सुरुवातीलाच दुसर्‍या लाटेने धडक दिली. कोरोनावर लस उपलब्ध झाल्याने बेफिकीर झालेल्या जनतेला या लाटेने चांगलाच तडाखा दिला. कोरोना व्यवस्थापनात ढेपाळलेल्या जिल्हा प्रशासनाला या लाटेने पळता भुई थोडी केली आहे. सातारा जिल्ह्यात रोज दोन हजारांच्या वर बाधित रुग्ण सापडत आहेत, तर पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतोय. पूर्ण जगभरात कोरोनाबाधितांवर रेमडेसिवीर हे रामबाण इलाज सिद्ध झाल्याने त्या इंजेक्शनचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. अनेक धनदांडग्यांनी या इंजेक्शनची साठेबाजी केल्यामुळे मेडिकलमध्ये काही हजारांमध्ये मिळणारे हेच इंजेक्शन सामान्यांना मिळणे दुरापास्त झाले.

एकूणच रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रेमडेसिवीरचे वितरण शासनाच्या कक्षेत घेतले. ज्या रुग्णाला खरेच गरज आहे, अशांना ही इंजेक्शन्स अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून थेट रुग्णालयात पोहोच केली जाऊ लागली. त्यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजार थंडावला, असे अनेकजणांना वाटले. मात्र, असे काहीच नव्हते. हजारांत मिळणार्‍या इंजेक्शनचा भाव पन्नास हजारांवर गेला. त्यामुळे बाधित गंभीर रुग्णांवर उपचार करावेत तरी कसे, असे अनेक प्रश्‍न मेडिकल प्रॅक्टिशनर्सना पडले. वास्तविक, आरटीपीसीआरच्या पाचव्या दिवसानंतर बाधितांवर उपचार सुरु केल्यास तो रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतो. एचआरसीटी स्कोअर पंधराच्या वर गेला तरच रुग्णाला सरकारी कोट्यातून रेमडेसिवीर मिळते. वास्तविक एचआरसीटी स्कोअर पंधराच्या वर गेल्यानंतर कोरोना विषाणूंनी त्या रुग्णाच्या फुप्फुसाचे काम अर्धेअधिक तमाम केलेले असते. त्यामुळे उशिरा दिलेल्या रेमडेसिवीरमुळे शरीरातील विषाणू जरुर मरेल. तरीही रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक बळावेल. वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांना हे सर्वकाही माहित आहे. मात्र, शासनाकडून कोणत्याच प्रकारचे सहाय्य मिळत नसल्याने तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने वैद्यकीय यंत्रणाही हतबल झाल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटर वर गेल्यानंतरच प्लाझ्मा देण्यासाठी धावपळ केली जाते. प्लाझ्मा नैसर्गिकरित्या विषाणूंचा विनाश करते.

ज्या पद्धतीने रेमडेसिवीर दिल्यानंतर व्हायरल लोड कमी होतो, त्याच पद्धतीने हेच काम प्लाझ्मा नैसर्गिकरित्या करीत असतो. कळतंय, पण वळत नाही, अशी काहीशी अवस्था जिल्हा प्रशासनाची झाली आहे. ज्या रुग्णाला वेळेत रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, त्याला त्यावेळेस हे इंजेक्शन मिळत नाही. परिणामी त्या रुग्णाची प्रकृती आणखीन ढासळते.ऐनवेळी नातेवाईकांनी धावाधाव करुन हे इंजेक्शन चढ्या भावाने बाजारातून विकत घ्यावे लागते. परंतू त्यानंतरही तो रुग्ण जगेल की नाही, याची शाश्‍वती कोणीही देत नाही. जिल्ह्यातील अनेक पुढार्‍यांनी, व्यवसायिकांनी व काही अधिकार्‍यांनीही आपल्या कुटूंबियांसाठी व बगलबच्च्यांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केला आहे. तो साठा आता काळ्याबाजारामार्फत बाहेर येत आहे. परवा फलटणमधील एका खाजगी रुग्णालयात या इंजेक्शनची तस्करी करताना अन्न व औषध प्रशासनाने काहीजणांना रंगेहात पकडलेले आहे, तर फलटणमधील एका बड्या डॉक्टरने शासनाकडून मिळणारे हेच इंजेक्शन सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त किंमतीने रुग्णांच्या माथी मारलेले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हा प्रशासनाचा पाय अधिक खोलात जावू लागला आहे.


जिल्हा प्रशासनाने खाजगी रुग्णालयांनासुद्धा कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, या रुग्णालयांकडूनसुद्धा बाधितांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरु आहे. पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत ऍडव्हान्स भरा. तरच रुग्णावर उपचार करतो, असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात येत आहे. अडला हरी, डॉक्टरचे पाय धरी’ अशी अवस्था आता लोकांची झाली आहे. कोण खासगी सावकारांकडे जमिनी घरे गहाण ठेवतोय, तर कोणी मायमाऊली आपली मंगळसूत्रे सराफाकडे गहाण ठेवते. याच्या पाठिमागे एकच उद्देश, आपला माणूस वाचला पाहिजे. पैसा तर येणार जाणार! परंतू जे गरीबाला कळतंय, ते श्रीमंताला कळत नाहीये. जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स स्वयंघोषित ‘कोरोनालॉजिस्ट’ झालेत. बाधित रुग्ण दगावला तरी त्याच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावून रुग्णाच्या नातेवाईकांकडून जेवढे काढता येईल, तेवढे काढले जात आहे. जेवढे लाटता येईल, तेवढे लाटले जात आहे. परंतू एवढे होवूनही आमचे कोणी वाकडे करु शकणार नाही, या अविर्भावात वावरणार्‍या स्वयंघोषित कोरोनालॉजिस्टांना जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी दणका दिला तरच हे डॉक्टर्स जागेवर येणार आहेत. अन्यथा डॉक्टर म्हणून आले आणि मल्ल्या म्हणून गेले, असे चालणार नाही.ज्याच्याकडे पैसा आहे, तो खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात लाखोंचा चुराडा करुन दाखल होत आहे. परंतू ज्या लोकांचे खायचे वांदे आहेत, अशा लोकांना मात्र वाली राहिलेला नाही. मतांसाठी दारोदार हिंडणारेही गरीब लोकांकडे कानाडोळा करु लागलेत. केवळ उपचारा अभावी अनेक कोरोनाबाधितांचा घरातच निपचित पडून मृत्यू झाला आहे. वाईट काळ येवून ठेपला आहे, परंतू त्याचाही धीरोदात्तपणे सामना करायला पाहिजे. श्रीमंत जगतील, परंतू गरीबांनाही जगवले पाहिजे. अधिकार्‍यांनी व डॉक्टरांनीही आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरुन तुंबड्या भरण्याचे काम बंद करावे. इथे नाहीतर, तिथे हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्यरित्या उपचार केले तरच लोक वाचणार आहेत. वरातीमागून घोडे नाचवून कोणालाच काही हाशील होणार नाही. मृतांच्या राशींवर नाचणार्‍यांनाही त्याच मार्गाने जायचे आहे, याचे भानही सध्या कोरोना काळात संबंधितांनी ठेवायला पाहिजे.

सीएस साहेब, कागदी घोडे नाचवू नका सकारात्मक निर्णय घ्या  !


सातारा जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला आहे. रॅट, आरटीपीसीआर चाचण्यांबरोबर एचआरसीटी (हाय रिझॉल्युशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी) ही कोरोनाबाधितांसाठी फायदेशीर ठरत आहे. या चाचणीद्वारे कोरोनाबाधिताच्या फुप्फुसातील संसर्गाची टक्केवारी समजते. त्यानुसारच त्या रुग्णावर डॉक्टरांमार्फत उपचार केले जातात. त्यामुळे या चाचणीसाठी सिटी स्कॅन मशिनची आवश्यकता भासते. सातारा, कराड सोडल्यास इतर तालुक्यांमध्ये कुठे सिटी स्कॅन मशीन आहे, तर कुठे नाही अशी परिस्थिती आहे. सातारा, कराडवरुन फलटण तालुका हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे. परंतू फलटणमध्ये सद्यस्थितीला फक्त एकच सिटी स्कॅन मशीन आहे. त्यामुळे या मशिनवरही दिवसेंदिवस वाढत चालत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ताण आलेला आहे. वारंवार हे मशीन बंद पडत असते. त्यामुळे फलटणमधील काही वैद्यकीय व्यवसायिकांनी एकत्र येवून नवीन सिटी स्कॅन मशीन करण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. परंतू यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पीसीपीएनडीटी ची बैठक घ्यावी लागते आणि या बैठकीनंतर सोनाग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय साठी परवानगी मिळते. या कमिटीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह काही लोकांचा समावेश असतो. जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही बैठक बोलावून, त्यासंबंधी चर्चा करुन संबंधितांना हा परवाना दिला जातो.गेल्या पंधरा दिवसांपासून फलटणमध्ये नवीन सिटी स्कॅन मशीन संदर्भात परवानगी मिळवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठपुरावा केला जात आहे. यासंदर्भातील पत्रेही त्यांच्या कार्यालयाकडे दिलेली आहेत. परंतू कळतंय, पण वळत नाही, का स्वार्थापोटी? ही फाईल अडविण्यात आली आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. सिटी स्कॅन करण्यासाठी वीस वर्षापासून नव्वद वयाचे अनेक कोरोनाबाधित रुग्ण फलटणमधील लाईफलाईन हॉस्पिटलसमोर भर उन्हात उभे राहत आहेत, हे दृश्य मनाला चरचर कापते. जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने जनाची नाहीतर मनाची बाळगून लवकरात लवकर पीसीपीएनडीटी कमिटीची बैठक घेवून आपल्या मनाची सर्जनशीलता दाखवावी, अशी मागणीही केली जात आहे.